कोकण

सिंधुदुर्ग : समुद्र खवळला; मच्छीमारी ठप्प

मोहन कारंडे

देवगड; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रदेखील खवळला असून सध्या पावसामुळे मच्छीमारी ठप्प झाली आहे. ताशी 45 ते 60 कि.मी. वेगाने जोराचे वारे वाहत आहेत. वातावरणातील बदलामुळे नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांबरोबरच मालवण, गुजरातमधील नौका देवगड बंदरात विसावल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच मालवण व गुजरातमधील नौकांचा समावेश आहे. पाऊस व वारा हे वातावरण आणखी दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार होणार्‍या वातावरणातील बदलामुळे मच्छीमारी
व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. नारळी पौणिमेनंतर खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात झाली.देवगड बंदरातील 40 ते 50 टक्के नौका या मच्छीमारीसाठी लोटण्यात आल्या. थोड्या प्रमाणात या नौकांना म्हाकुळ मासळी मिळत होती. मात्र, वादळसदृश व पावसाळी वातावरण यामुळे सध्या नौका बंदरात दाखल झाल्या आहेत. कर्नाटक राज्यातील काही खलाशीवर्ग गणेश चतुर्थीपूर्वी दाखल झाला होता. तर रत्नागिरी व स्थानिक खलाशीवर्ग अनंत चतुर्दशीनंतर कामावर रूजू झाला. मात्र, वार्‍यांसह पावसाळी वातावरण झाल्याने समुद्रातील मच्छीमारी व्यवसायच ठप्प झाल्याने खलाशीवर्ग सध्या बंदरात उभ्या असलेल्या नौकांवर आहे.

तीन चार दिवसानंतर वातावरण काही प्रमाणात निवळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, वातावरण पूर्ण निवळल्यानंतरच समुद्रातील मच्छीमारीला सुरुवात होणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर दुसर्‍या दिवशीपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, मध्येच पाऊस विश्रांती घेत असल्याने तालुक्यात पडझड अथवा पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना अद्याप घडल्या नाहीत. मात्र पावसाळी वातावरणामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.

SCROLL FOR NEXT