दोडामार्ग; ओम देसाई : आंतरजिल्हा शिक्षक बदलीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 128 प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. शिक्षण अधिकार्यांनी या शाळांवर पर्यायी शिक्षकाची नियुक्ती केली असली तरी पाल्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जागरूक पालकांच्या मनात मोठी धडकी भरली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच अशी परिस्थिती ओढवल्याची चर्चा आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाप्रती सतर्क असतात. मुलांच्या शिक्षणात तडजोड त्यांना मान्य नसते. अशातच मुलांना शिक्षण देण्यात जर शासन तडजोड करत असेल तर ते सर्वच पालकांना अमान्य राहिल. याविरोधात पालक व शिक्षण प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. यापूर्वी आंतरजिल्हा शिक्षक बदलीमुळे जिल्ह्यातील शिक्षक पदे जास्त रिक्त राहणार नाही याची काळजी घेतली जायची. जेणेकरून शाळांवर शिक्षकांची कमतरता कमी प्रमाणात भासायची. मात्र विद्यमान सरकारने सरसकट आंतरजिल्हा बदलीला परवानगी देऊन इच्छुक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आदेश शिक्षण विभागाला दिला. या आदेशाचे पालन केले गेले आणि त्याचा गंभीर परिणाम सध्या शिक्षणमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील मुले व पालकांना भोगावे लागत आहेत.
जिल्ह्यात सध्या 128 शाळा शून्यशिक्षकी आहेत. या शाळांवर पर्यायी शिक्षक देण्यासाठी शिक्षण अधिकार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच जास्त पटसंख्येच्या शाळेतील शिक्षक अन्यत्र हलविल्याने पालक संतप्त होत आहेत. आमच्या शाळांवरील शिक्षक आम्हाला द्या या मागणीसाठी शिक्षण विभागाविरोधात जिल्हाभर आंदोलने सुरू आहेत.
नियोजनशून्य कारभाराचा फटका
फेब्रुवारीमध्ये राज्यात शिक्षकभरतीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटूनही शिक्षक भरती झाली नाही. तसेच शिक्षक भरतीनंतर शिक्षकांची सरसकट आंतरजिल्हा बदली केली. राज्यात सर्वत्र जूनमध्ये शाळा सुरू होतात. त्यामुळे भरतीप्रक्रिया शीघ्रगतीने राबवून जूनपूर्वीच नवीन शिक्षक रुजू करून घेत त्यांना पदभार देणे गरजेचे होते. मात्र सरकारच्या शिक्षक भरतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या माझ्या दोन मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
– विलास नाईक (हेवाळे, ता. दोडामार्ग) पालक
पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणासाठी आंदोलन भूषणावह नाही
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. माझ्या मुलीला सर्वप्रथम इंग्रजी माध्यम शाळेत पाठवण्याचा मी विचार करत होतो. मात्र जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण मिळत असल्याने तिला जि.प. शाळेत दाखल केले. या शाळांमधील परिस्थिती शिक्षकाविना भीषण झाली आहे. शिक्षणासाठी पुरोगामी महाराष्ट्रात आंदोलन करणे ही अत्यंत शरमेची बाब झाली आहे.
– गुरू देसाई- बाबरवाडी, ता. दोडामार्ग पालक
अन्यथा इंग्रजी शाळेत पाठवले असते
माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमात पाठवण्याचा माझा पूर्वी विचार होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला जि.प. शाळेत शिक्षणासाठी पाठविले. आताची शिक्षणाची गंभीर परिस्थिती पाहता मला पश्चाताप होत आहे. कारण शाळेत शिक्षक नसल्याने माझ्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळेल की नाही? याचीच भीती तावत असून मानसिक त्रास होत आहे. तेच जर शारीरिक त्रास सहन करून मुलाला इंग्रजी शाळेत पाठवले असते तर मुलाचे नक्की भले झाले असते आणि माझा मानसिक त्रास कमी झाला असता.
– दिनेश परब- साटेली- भेडशी, ता. दोडामार्ग पालक