कोकण

सिंधुदुर्ग विमानतळाचे नवे नाव बॅ. नाथ पै; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मोहन कारंडे

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग एअरपोर्टचे (चिपी) नाव बॅरिस्टर नाथ पै विमानतळसिंधुदुर्ग असे करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सिंधुदुर्ग एअरपोर्ट हे आता 'बॅरिस्टर नाथ पै विमानतळ' या नावाने ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे, बॅ.नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून विमानतळ नामकरणाच्या रूपाने जन्मशताब्दी वर्षात बै. नाथ पै यांच्या नावाचा याथार्थ गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सिंधुदुर्गवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अनंत अडथळ्यांची शर्यत पार करत वेंगुर्ले तालुक्याच्या चिपी माळरानावर विमानतळ आकाराला आले. राजकीय आरोप -प्रत्यारोपात 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग विमानतळावरून 'अलायन्स एअर'कंपनीच्या माध्यमातून प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली. विमानतळ सुरू झाल्यानंतर विमानतळाचे नाव काय असणार, याची उत्सुकता जनतेला होती. खरं तर चिपी विमानतळ पूर्ण होवुन केंद्रिय पातळीवरून काही परवानग्या मिळणे बाकी असताना 24 ऑगस्ट रोजी खा.विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. माजी खासदार बॅ.नाथ पै हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते.

कोकणचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे कोकणच्या विकासातील आदर्श व्यक्तीच्या नावाने सिंधुदुर्ग विमानतळ ओळखले जावे, अशी या मागे भावना असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले होते. दुसरीकडे परूळे-चिपी ग्रामस्थांनी विमानतळ परूळे-चिपी भागात येत असल्यामुळे परूळे- चिपी नाव विमानतळाला देण्याची मागणी तत्कालिन केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कुडाळ येथे झालेल्या बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी अभिवादन सभेत जेष्ठ अर्थतज्ज्ञ व मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सिंधुदुर्गातील व कोकणातील सर्व जनतेच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै यांचे कायमस्वरूपी स्मरण रहावे यासाठी चिपी विमानतळाचे नाव 'बॅ.नाथ पै चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे व्हावे असा ठराव घेतला. यावेळी उपस्थितांनी हात उंचावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याला दोन दिवस होत नाहीत तोच राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै नाव देण्याचा निर्णय घेतला. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अमोघ वाणीचे उत्तम संसदपटू बॅ. नाथ पै

बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवामुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. अमोघ वाणी लाभलेले ते उत्तम संसदपटू होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य लक्षात घेवून चिपी परुळे येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

SCROLL FOR NEXT