सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी गोड करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. मात्र, आम्हाला चिथवण्याचा, राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आम्ही दाद देणार नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येईलच. एकाचवेळी असे उत्तर देऊ की यापुढे हिंमत होणार नाही असा हल्लाबोल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे नवीन शिक्षण धोरण आहे ते राज्याच्या शिक्षण खात्यात लवकरच आणले जाईल. उद्योग कृषी क्षेत्रात महाराष्ट्र कसा आघाडीवर राहील, यासाठी आम्ही सरकार या नात्याने कटिबद्ध राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, शिक्षण खात्यात आमूलाग्र बदल येत्या काळात होणार असून हुशार मुलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील मुलांच्या विकासासाठी अधिक भर देणार आहे. आनंदाचा शिधा वाटपाच्यावेळी ऑनलाईनची अडचण ठरत असल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईनच्या माध्यमातून ताबडतोब शिधा वाटप करायला लावले. लोक सुखी व्हावेत हा आमचा मुख्य हेतू आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार हे भाजपच्या संपर्कातच असतात, त्यामुळे कोण काही लिहीतं किंवा बोलतं याला महत्त्व नाही असा टोला उद्धव ठाकरे गटाला त्यांनी हाणला. तर उद्धव ठाकरे पक्षासाठी बाहेर पडत होते. आज जनतेसाठी बाहेर पडले याचा आनंद आहे असा मिश्किल टोला ना. केसरकर यांनी लगावला आहे.
बेस्टच्या कर्मचार्यांनी ऐन दिवाळी सणात संप करू नये. लोकांच्या साणासुदीचे दिवस असून त्यांचे आशीर्वाद कर्मचार्यांनी घ्यावे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. शासनाने बेस्ट कर्मचार्यांना देखील सहानुभूती दाखवावी अशा मताचे हे सरकार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची कर्मचार्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू. जे एसटी कर्मचार्यांच्या बाबतीत घडलं ते बेस्टच्या कर्मचार्यांसोबत होऊ नये. सामोपचाराने सर्व समस्या मार्गी लागतील असे आश्वासन मुंबईचे पालकमंत्री या नात्याने आपण देत असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.
सध्या शेतकर्यांच्या खात्यात वेळेत दुप्पट भरपाई जमा होत आहे. ज्यांनी वेळेत कर्जभरणा केला त्यांचे पैसे एकावेळेत खात्यात जमा होत आहेत. हे सरकार शेतकर्यांच्या भल्याचे आहे. सध्या ज्या शेतकर्यांची हानी झाली आहे त्यांचे पंचनामे देखील वेळेत होत आहे. हे सर्व पूर्वीच्या सरकारने का नाही केले असा सवाल ना. केसरकर यांनी करत या सर्व बाबींमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सतर्क राहून निर्णय घेत आहेत. दिवाळी सणात शिधा वाटप करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. लोकांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. पेट्रोल,डिझेलच्या किंमती यापूर्वी देखील कमी झाल्या असत्या. मात्र का नाही झाल्या? कुठली सवलत दिली गेली याचाही विचार लोकांनी केला पाहिजे.
आमचं सरकार आल्याबरोबर शेती पंपाचे दर अर्ध्यावर आले हे सगळं करण्यासाठी इच्छाशक्ती लागते केवळ लोकांची मतं मागून होत नाही. सध्या सेनेत सहानुभूती मिळवण्यासाठी एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मात्र हेच जर शेतकर्यांच्या बेस्ट तसेच एसटी कर्मचार्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज हे दिवस पहायला मिळाले नसते असे ना. केसरकर म्हणाले. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही चालत आहोत म्हणून आमचा पक्ष वाढला असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व खात्यातील कर्मचार्यांच्या एकाच वेळी भरती प्रक्रिया घेतल्या जातील त्यांना न्याय दिला जाईल असा निर्णय घेणारे हे सरकार अतिशय गतिमान सरकार आहे.पाच वर्षामध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाली होती तीच गती मुख्यमंत्री शिंदे यांच्या कालावधीत महाराष्ट्राला मिळणार असल्याचे ना.केसरकर म्हणाले.