कोकण

सिंधुदुर्ग : निवास व न्याहारी योजनेमुळे कोकणच्या पर्यटनाला चालना

मोनिका क्षीरसागर

अलिबाग : जयंत धुळप
कोकणात पर्यटनाला विलक्षण वाव असून, निवास आणि न्याहारी योजनेला नवी झळाळी देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत निवास व न्याहारी योजनेंतर्गत एक हजार निवारे पर्यटकांकरिता उपलब्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याचा पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यांच्या कार्यकक्षा व कार्यपद्धती स्वतंत्र झाल्या. त्यात निवास व न्याहारी योजना एमटीडीसीकडेच राहिली. सद्यस्थितीत एमटीडीसीला आपले स्वतःचे पर्यटन निवारे वा रिसॉर्ट नफ्यात आणण्याकरिता सर्व लक्ष केंद्रित करावे लागत आहे. सर्वच पर्यटनस्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाहीत, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून पर्यटकांसाठी निवास व न्याहारी योजना अंमलात आणण्यात आली. तिला कोकणात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी निवास व न्याहारी योजना सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सुरू केल्यावर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण झाल्या. कोकणच्या किनारी भागात तसेच आशादायी चित्र दिसून आले. एमटीडीसीच्या अधिकृत मंजुरीमुळे घरमालकांनाही लाभ झाला. या योजनेत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. बर्‍याच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी बंगले, घरे व फ्लॅटस् रिकामे पडून असतात. त्यांचा या योजनेखाली उपयोग करण्यात येत आहे.

विशेषत:, घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी या निवास व न्याहारी योजनेतील निवार्‍यांचे संपूर्ण व्यवस्थापन महिलांकडूनच पाहिले जाते. त्यातून त्यांना उत्पन्‍नाचे भक्‍कम साधन प्राप्‍त झाले आहे. या योजनेत सहभागी झालेल्या स्थानिकांच्या जागांची माहिती पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांना देण्यात येते. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणार्‍या निर्देशिकेमध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावरही (वेबसाईटवर) माहिती प्रसिद्ध केली जाते. त्याद्वारे या घरमालकांच्या जागांबद्दल पर्यटकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण होते.

प्रारंभीच्या काळात या योजनेला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाकडून एमटीडीसीच्या माध्यमातून काही सवलती संबंधित घरमालकांना दिल्या होत्या, त्यामुळे ही योजना यशस्वी झाली. मात्र, आता या सवलती हळूहळू बंद होत असल्याने निवास व न्याहारी योजनेतील नोंदणीकृत मालक अडचणीत आले आहेत. तथापि, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. न्याहारी व निवास योजनेतील सदस्य मालकांच्या या समस्या जाणून घेण्याची निकड निर्माण झाली आहे. कारण, न्याहारी व निवास योजनेमुळे कोकणातील ग्रामीण भागांत पर्यटन विकसित होऊ लागले असून, बर्‍यापैकी सुबत्ताही नांदू लागली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी आणि मुख्य म्हणजे घरच्या घरी अधिकृत रोजगार प्राप्‍त झाला आहे. पर्यटन विकास आणि पर्यटन व्यवसाय बहरणे ही काळाची गरज आहे. कोरोना महामारीचा प्रभावदेखील दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. त्यामुळे न्याहारी आणि निवास योजना आणखी समृद्ध व्हायला हवी.

कोकणातील निवास व न्याहारी योजनेत एक हजाराहून अधिक निवारे नोंदणीकृत आहेत. त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवार्‍यातील स्वच्छता, पर्यटकांचे आदरातिथ्य, माहितीची उपलब्धता, पर्यटक पुनःपुन्हा यावेत यासाठी त्यांच्याशी लाघवी भाषेत संवाद कसा साधावा, हे विषय या प्रशिक्षणात असणार आहेत. सध्या कोकणात टूरिस्ट गाईडचे प्रशिक्षण सुरू आहे.  – हनुमंत हेडे, पर्यटन उपसंचालक, कोकण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT