कोकण

सिंधुदुर्ग : तोंडवळीतील तरूण व्यापार्‍याची आत्महत्या!

मोहन कारंडे

मालवण (पुढारी वृत्तसेवा) : तोंडवळी येथील प्रसिद्ध किराणा व्यवसायिक समीर भगवान मुंज (37) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत मंगळवारी सायंकाळी ओझर येथील त्यांच्या बंगल्यातील खोलीत आढळून आला. घरात कोणीही नसल्याने घराच्या परिसरात राहणार्‍या व्यक्तींनी खिडकीतून बेडरूममध्ये प्रवेश करत समीर याचा मृतदेह गळफासातून काढला होता. समीर याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

समीर याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. समीर मुंज याचे कोळंब येथे किराणा मालाचे दुकाने होते. सर्जेकोट, कोळंब, रेवंडी, कांदळगाव, ओझर या परिसरातील ग्रामस्थ याठिकाणी खरेदीसाठी येत असत. मुंज याने अल्पावधीतच आपल्या व्यवसायात जम बसविला होता. मुंज यांचे तोंडवळी याठिकाणीही रास्तधान्य दुकान आणि किराणा मालाचे दुकान होते. यामुळे कुटुंबाचा व्यवसाय त्यांनी कोळंब येथे सुरू केला होता. तो मनमिळावू व हसतमुख स्वभावाचा असल्याने अनेकांना परोपकारी वृत्तीने सहकार्य करत असे.

समीर याने ओझर येथे बंगला खरेदी करून त्याठिकाणी तो वास्तव्यास होता. पत्नी, मुली असे एकत्रितपणे तो राहत होता. बाळंतपणासाठी समीर याची पत्नी माहेरी कुडाळ याठिकाणी गेली होती. यामुळे समीर घरात एकटाच राहत होता. तो जेवणासाठी आणि चहासाठी घरच्या परिसरातील एका कुटुंबियांकडे नेहमी जात असे. मंगळवारी दुपारी तो जेवणासाठी घरी आलेला नव्हता. तसेच चहा पिण्यासाठीही तो न आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी गेले असता घर आतून बंद असल्याचे दिसून आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याच्या खोलीत खिडकीतून आत प्रवेश केला असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने गळफास घेतलेली ओढणी कापून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्याची बहिणीला या घटनेची माहिती देण्यात आली. तसेच पत्नीलाही ग्रामस्थांनी माहिती दिली. काही वेळानंतर समीर याची आई आणि भाऊ बंगल्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या आईने टाहो फोडला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेवून तपास सुरू केला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, हेमंत पेडणेकर, प्रतीक जाधव, कैलास ढोले तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. समीर याने आत्महत्या केल्याची बातमी सर्वत्र पसरताच त्याच्या बंगल्याच्या परिसरात त्याच्या मित्र परिवाराने गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT