सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 745 पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 89 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने कोणत्याही प्रकारचा साथरोग उद्भवू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दूषित पाणी हे यामागील कारण ठरू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 745 पाणी नमुने तपासण्यात आले त्यापैकी 89 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात सरासरी 11.95 टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असून सर्वाधिक मालवण तालुक्यात 64 टक्के पाणी नमुने दूषित आढळून आले असल्याची माहिती डॉ. खलीपे यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या मे 2022 महिन्याच्या पाणी नमुने तपासणीच्या माहितीनुसार जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपासण्यात आलेल्या एकूण 745 पाणी नमुन्यांपैकी 89 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. ग्रामीण भागातील दूषित पाण्याचे प्रमाण पाहता सरासरी 11.95 टक्के एवढे आहे. दोडामार्ग तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण (9.88 टक्के) आहे. या व्यतिरिक्त सावंतवाडी तालुक्यात 11.35 टक्के, वेंगुर्ला 15.39 टक्के, कुडाळ 6.70 टक्के, मालवण तालुक्यात सर्वाधिक 64 टक्के, कणकवली 10 टक्के, देवगड 16.44 टक्के, वैभववाडी 0 टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असल्याची माहिती डॉ. खलीपे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे तर शहरी भागात दूषित पाण्याचे प्रमाण 0 टक्के एवढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात 100 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये एकही पाणी नमूना दूषित आढळला नाही. तर ग्रामीण भागात तपासण्यात आलेल्या 745 पाणी नमुन्यापैकी दोडामार्ग तालुक्यात 81 पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 नमुने दूषित आढळून आले आहेत.
तर सावंतवाडी तालुक्यात 141 पाणी नमुन्यांपैकी 16 दूषित, वेंगुर्ला तालुक्यात 85 पाणी नमुन्यांपैकी 13 दूषित, कुडाळ तालुक्यात 194 पाणी नमुन्यांपैकी 13 दूषित, मालवण तालुक्यात 25 पाणी नमुन्यांपैकी 16 दूषित, कणकवली तालुक्यात 110 पाणी नमुन्यांपैकी 11 दूषित, देवगड तालुक्यात 73 पाणी नमुन्यांपैकी 12 दूषित, आढळून आले आहेत. तर वैभववाडी तालुक्यात 36 पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दूषित आढळून आला नाही.
पाणी नमुने तपासण्याचे स्वरूप
आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने पाणी नमुने तपासण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या जलदूतांमार्फत दर महिन्याला काही ठराविक भागातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाणी नमुन्यांची तपासणी करून हे पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य आहेत की अयोग्य याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत देण्यात येतो. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास ते जलस्रोत शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. तसेच दुषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे बघण्यासाठी पुन्हा नमुने तपासण्यात येतात.