सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळामध्ये नियमभंग करणार्यांविरुद्ध सिंधुदुर्ग पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल 74 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात 10 लाख रुपयांची रक्कम सावंतवाडी पोलिस विभागाने वसूल केली आहे. ही कारवाई 1 जानेवारी 2021 ते 31 जुलै 2021 पर्यंत 7 महिन्यांमध्ये केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सय्यद, जाधव, महिला पोलिस निरीक्षक स्वाती यादव, पोलिस उपनिरीक्षक पाटील, यशवंते तसेच पोलिस अंमलदार प्रसाद कदम, महेश जाधव, लोकरे, मनोज राऊत, दर्शन सावंत, दत्ता देसाई, बाबू तेली, गुरू नाईक, भागवत, केरकर, डिसोझा, वाहतूक पोलिस प्रवीण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई यांनी सावंतवाडी पोलिस ठाणे आंबोली, सातार्डा, सावंतवाडी शहर हद्दीत केलेल्या कारवाईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणे,वाहतूक नियमांचा भंग करणे आदींचा समावेश आहे.
वर्ष 2020 मध्ये 113 केसेस, वर्ष 2021 मध्ये 96 केसेस अशा मिळून 209 केसेसमधून रुपये 1,19,500 चा दंड वसूल करण्यात आला. मास्क न परिधान केल्याप्रकरणी 2021 जुलै अखेरपर्यंत 1473 जणांविरुद्ध कारवाई करून 3 लाख 2 हजार 300 रुपयांचा सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला.
तर मोटार व्हेईकल अॅक्ट अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये परवाना नसताना वाहन चालवणे, परवाना सोबत नसणे, हेल्मेट परिधान न करणे, वाहनाला काळी काच लावणे, मोबाईलवर संभाषण करणे, सीट बेल्ट न लावणे, वाहनाचा विमा नसणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, इशारा न देता वाहन हाकणे व इशारा तोडणे आणि इतर अशा केसेस मिळून 2,231 केसेसद्वारे 5 लाख 19 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये सर्वाधिक दंड वाहन परवाना नसणे अशा 832 जणांविरुद्ध कारवाई करून 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, या कारवाईमध्ये वाहतूक शाखा सिंधुदुर्गने सर्वाधिक 13 हजार 266 जणांविरुद्ध कारवाई करून 33 लाख 56 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
यामध्ये कणकवली विभागाने 5 हजार 942 जणांविरुद्ध कारवाई करून 16 लाख 74 हजार रुपयांचा दंड, सावंतवाडी विभागाने 7 हजार 481 जणांवर कारवाई करून 18 लाख 69 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे असा मिळून एकूण 74 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला
दरम्यान, सावंतवाडी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, आंबोली वर्षा पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांनी आंबोलीमध्ये येऊ नये. आंबोली मध्ये पर्यटनस्थळी फिरताना आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सावंतवाडी पोलिसांनी दिला आहे.