कोकण

संगमेश्‍वर मध्ये एटीएम फोडले; चोरटा पाच तासांत गजाआड

Arun Patil

संगमेश्‍वर ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेले एटीएम चोरट्याने फोडून पलायन केले. मात्र, एटीएमच्या सुक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान दाखवित त्याचा पाठलाग केला.

पोलिसांना या बाबतची महिती देताच सलग पाच तासांच्या शोधानंतर चोरटा संगमेश्‍वर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. हेमंत पांडुरंग देसाई (रा. मुंबई) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वर जवळ श्री समर्थ कृपा इमारतीच्या तळजल्यावर कॅनरा बँकेचे एटीएम मशिन आहे. शुक्रवारी रात्री 11.15 च्या सुमारास तेथील पहारेकरी संदीप नारायण महाडिक याने त्या चोरट्याला हटकल्यावर तो पळू लागला. यामुळे संशय बळावल्याने महाडीक याने त्याचा पाठलाग सुरु केला. तसेच पोलिसांनाही याची तातडीने माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक उदय झावरे हे पोलिस कर्मचारी शिंदे, देशमवांड, खोंदल, आव्हाड, रामपुरे तसेच कर्तव्यावरील गृहरक्षक झेपले यांच्यासह घटनास्थळी आले. तोपर्यंत चोरटा संगमेश्वर बसस्थानकाच्या जवळच्या घरांमध्ये शिरला होता. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला. सलग पाच तास अंधारातच पाठलाग केल्यावर नंतर चोरट्याला पकडण्यात यश आले.

हेमंत देसाई (रा. मुंबई, सध्या रा. चवे मु. पो. दुऊड ता. जि. रत्नागिरी) असे पोलिसांनी पडकलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. या घटनेत चोरट्याने एटीएम मशिन फोडले असले तरी रोकड सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या बाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात मधुकर देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT