कोकण

वरवडेत 307 पाळीव डुकरांची विल्हेवाट; ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ ची लागण

अनुराधा कोरवी

कणकवली : पुढारी वृत्तसेवा :  वरवडे गावातील एका डुकरांच्या फार्ममधील (पीग फार्म) 100 पाळीव डुकरांचा तापाने मृत्यू झाला होता. रक्त नमुना तपासणीमध्ये हा ताप आफ्रिकन स्वाईन फिवर असल्याचे निष्पन्न झाले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पशुसंवर्धन सहआयुक्तपुणे यांच्या आदेशाने रविवारी या फार्ममधील 307 डुक्करांची विल्हेवाट लावण्यात आली. सिंधुदुर्ग पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या 40 जणांच्या पथकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवत ही कारवाई केली.

वरवडे गावातील एका फार्ममधील काही पाळीव डुकरांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. यातील अनेक डुकरांचा मृत्यू झाला होता. या डुक्करांवर पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी उपचारासंदर्भात उपाययोजना करीत होते. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून त्या डुकरांचे रक्त नमुने पुणे येथे व तेथून भोपाळ येथील लॅबकडे 9 ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आले होते.

या रक्त नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून डुकरांचा अहवाल 'आफ्रिकन स्वाईन फिवर' पॉझिटिव्ह आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या होत्या. एखाद्या फार्ममधील डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिवरची लागण झाल्यास तेथील डुकरांच्या मृत्यूचा दर हा 100 टक्के असतो. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून अशा आफ्रिकन स्वाईन फिवरची लागण झालेल्या ठिकाणच्या सर्व डुकरांची विल्हेवाट लावावी लागते.

याविषयी केंद्र शासनाकडून प्राप्त असलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन व सहआयुक्त पशुसंवर्धन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार फार्ममधील उर्वरित डुकरांचीही विल्हेवाट लागण्याची उपाययोजना रविवारी सुरू करण्यात आली. जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.आर. बी. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे 15 वैद्यकीय अधिकारी, 15 पर्यवेक्षक, 10 परिचर याचे पथक रविवारी वरवडे गावातील त्या फार्मवर पोहोचले.

यावेळी फार्ममध्ये 307 डुक्कर असल्याचे दिसून आले. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पहिल्यांदा त्या डुकरांना झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. त्यांनतर दुसरे इंजेक्शन दिल्यावर डुकरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे दफन करण्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्या फार्म हाऊसच्या आवारातच ही कार्यवाही करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT