कोकण

राजापुरात पूरस्थितीचे ‘अपडेट’ मिळणार

मोहन कारंडे

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : नदीच्या वाढणार्‍या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाईम डाटा अ‍ॅक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने अर्जुना नदीवरील पुलावर बसवली आहे. तसेच तालुक्यातील आठ ठिकाणी पावसाच्या पाण्याची मोजदाद करणारी रेन गेज यंत्रणाही बसविण्यात आली आहे. त्याद्वारे अतिवृष्टीमध्ये वारंवार येणार्‍या पुराच्या वेढ्यास कारणीभूत ठरणार्‍या अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीसह पावसाच्या पाण्याची मिनिटा-मिनिटाला अपडेट प्रशासकीय यंत्रणेला मिळणार आहे.

याबाबतची माहिती नुकतेच निवृत्त झालेले देवरूख येथील जलविज्ञान प्रकल्पाचे उपविभागियी अभियंता रावसाहेब चौगुले यांनी दिली. या माहितीद्वारे संभाव्य पूरस्थितीपासून लोकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देणे वा संभाव्य पूरस्थितीपासून संभाव्य आपद्ग्रस्त लोकांचा बचाव करणे प्रशासकीय यंत्रणेला आता अधिक सोपे होणार असल्याचा विश्वास चौगुले यांनी व्यक्‍त केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन विशेषतः कोकणामध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये अतोनात नुकसान होत आहे.

या संभाव्य पूरस्थितीची लोकांना आधीच माहिती मिळाल्यास त्यामध्ये होणारी वित्त आणि जीवितहानी टाळणे अधिक सोपे होईल. यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृष्णा खोर्‍याच्या धर्तीवर जलसंपदा विभागाच्या नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर रिअल टाईम डाटा अ‍ॅक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) यंत्रणा बसवली आहे. एआरएस आणि एडब्लूएलआर या दोन यंत्रणांमुळे एका क्लिकवर पडलेला पाऊस आणि नद्यांच्या विद्यमान पाण्याची पातळी काही मिनिटांमध्ये कळणार आहे.

मोबाईल अ‍ॅपही विकसित

अ‍ॅटोमेटिक ब्रीज रडार सेन्सॉरसह रेन गेज उपकरणे यांच्या माध्यमातून मिळणार्‍या पावसाची आणि नद्यांच्या वाढणार्‍या पाण्याच्या पातळीच्या माहितीची अपडेट देणारे मोबाईल अ‍ॅप पाटबंधारे विभागाने विकसीत केले आहे. अ‍ॅटोमेटिक ब्रीज रडार सेन्सॉरसह रेन गेज उपकरणे हे सॅटेलाईटच्या माध्यमातून या अ‍ॅपला जोडण्यात आल्याची माहिती निवृत्त उपविभागीय अभियंता रावसाहेब चौगुले यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT