कोकण

रत्नागिरीवर ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वॉच

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता शहराच्या कानाकोपऱ्यात पोलिसांचे लक्ष राहणार आहे. शहराच्या हद्दीत ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून 'एंट्री' केल्यापासून आता प्रत्येकाच्या हालचालीवर 'वॉच' राहणार आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी सुमारे एक कोटींचा निधी उपलबद्ध करून देण्यात आला असून प्रजासत्ताक दिनापासून याचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत.

शहरातील वाढत्या लोकसंख्ये सोबतच पर्यटन, नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने नियमित हजारो लोक रत्नागिरीत येतात. काहीवेळा गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हा करून शहरातून गायब होतात. त्यांचा शोध घेणे अनेकवेळा अवघड होते. पोलिसांची गस्त २४ तास सर्वच भागात ठेवणे शक्य नाही अशा वेळी पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आता काम करणार आहे.

रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिस उपविभागीय कार्यालयामार्फत पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी जिल्हा नियोजन विभागाकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १ कोटी निधीची मागणी केली होती. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या निधीला मान्यता दिल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम एका एजन्सीकडे देण्यात आले होते.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी एजन्सी निश्चित झाल्यानंतर विद्यमान पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उत्तमरित्या पाठपुरावा केल्यानंतर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली होती. नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. शहराच्या शेवटच्या टोकापासून म्हणजे भगवतीमंदिर परिसर, मिरकरवाडा जेटी, भगवती जेटी, शहरातील अंतर्गत सर्व रस्ते, मांडवी, भाट्ये समुद्र किनारा, मुख्यबाजारपेठ, प्रमुख मार्ग, एसटी बस स्थानक, जयस्तंभ, जिल्हा रुग्णालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जेल नाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप, कुवारबाव, नाचणे, कोकणनगर या भागात सुमारे ५७ कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा कंट्रोल ठेवण्यात आला आहे. तेथून संपूर्ण शहरावर सीसीटीव्हीद्वारे पोलिस वॉच ठेवणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पुर्ण झाले असून अंतिम चाचणी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी सीसीटीव्ही कॅमेरे युनिटचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे पोलिस विभागातून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT