चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र तालुकाप्रमुख संदीप सावंत आक्रमक झाले. सावर्डे येथे परिवहन अधिकार्यांची गाडी जात असतानाच शिवसैनिकांनी ही गाडी अडवली आणि त्यांनी आम्ही शासनाला वाहन कर देत नाही का. परिवहन खात्याची ही जबाबदारी नाही का, असा सवाल करीत तालुकाप्रमुख सावंत यांनी, खड्डे भरले नाहीत तर अधिकार्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला.
मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाल्याचे चित्र समोर येत आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख सावंत यांनी महामार्गावरील खड्ड्यात भात लावणी करण्याचा इशारा देत नंतर प्रत्यक्ष महामार्गावरील खड्ड्यात भातरोपांची लावणी देखील केली. सोमवार दि.18 रोजी सकाळी सावर्डे येथे शिवसैनिक जमले असताना अचानक त्यांना आरटीओंची गाडी समोरून येताना दिसली. यावेळी शिवसैनिकांनी ही गाडी अडविली व आरटीओच्या अधिकार्यांना जाब विचारला.
रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी परिवहन खात्याची नाही का? खड्डे का भरले जात नाहीत? खड्डे तत्काळ भरा अन्यथा आपल्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा उपस्थितांनी दिला.
यावर परिवहन अधिकार्यांनी संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गला सांगा, असे सांगताच संदीप सावंत आक्रमक झाले व त्यांनी आरटीओची गाडी रोखून धरली व अधिकार्यांना खडेबोल सुनावले. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.