कोकण

रत्नागिरी : शिवसैनिकांमध्ये ‘संशयकल्लोळ’

मोहन कारंडे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील एक आमदार व एक मंत्री एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. अजूनही स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात असून शिंदेंच्या गोटात गेलेल्या लोकप्रतिनिधींबाबत लोकांच्या मनात संशयकल्लोळ आहे. विशेषकरून शिवसैनिक संभ्रमात असून हा संशयकल्लोळ अद्याप दूर झालेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय केंद्र म्हणून चिपळूण तालुक्याकडे पाहिले जाते. मात्र, या ठिकाणी असलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी याआधीच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. मध्यंतरी त्यांच्या बाबतीतही अफवा उठली होती. मात्र, मुंबईतील अनेक मेळाव्यांमधून ते तडाखेबाज भाषण करीत आहेत व बंडखोरांना जाब विचारत आहेत. जिल्ह्यात एकूण पाच आमदार आहेत. त्यातील राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले ना. उदय सामंत यांना सेनेने मंत्रिपद बहाल केले. गेली अडीच वर्षे ते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कारभार पाहात आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सर्वात शेवटी त्यांना जाऊन मिळणारे सामंत यांच्याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ना. सामंत यांचे चिपळूणमध्येही काही समर्थक आहेत. त्यांच्याकडून ही अस्वस्थता व्यक्‍त होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी वर्षा बंगला सोडला त्यावेळी ना. सामंत हे याच ठिकाणी होते. केंद्रीय समितीच्या बैठकीला हजर होते. मात्र, गुवाहाटीचे विमान पकडल्याने जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोलीचे आ. योगेश कदम यांनी आपण शिवसेनेतच राहाणार. शेवटपर्यंत शिवसेनेला सोडणार नाही, अशी भूमिका ट्वीटरवर जाहीर केली आहे. त्यामुळे गुवाहाटीतून परतल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल, याकडे दापोली मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दुसर्‍या बाजूला लोकसभा निवडणुकीनंतर फार न दिसणारे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सक्रिय झाले आहेत. लोटे येथे त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण उद्धव ठाकरेंना साथ द्यायची असा निर्धार केला आहे. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्ता या बंडामुळे गोंधळात पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोकणात मात्र मोठ्या प्रमाणात निधी आला. शिवसेनेचे चार आमदार आणि राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम यांनी कोकणसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. असे असतानाही जिल्ह्यातील पाचपैकी दोन आमदार शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. याबाबत शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दापोलीमध्ये आ. योगेश कदम समर्थक आणि शिवसेना समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली. या बंडाचा परिणाम गुहागर, चिपळूण आणि राजापूर मतदारसंघावर झालेला नाही. चिपळूणमध्ये माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. या घडामोडी जिल्ह्यात घडत असताना मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अजूनही उत्तर मिळालेले नाही. शिवसेना सोडणार नाही, असे म्हणणारे आ. योगेश कदम व ना. उदय सामंत शिंदेंंच्या गोटात मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये संशयकल्लोळ आहे.

शिवसैनिक खंबीर : सचिन कदम

अजूनही स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परंतु, याही परिस्थितीत शिवसैनिक खंबीर आहे. याआधी अनेक संकटे आली आणि गेली. वादळे येत असतात आणि जातातही. मात्र, शिवसैनिक कधीही वादळाने हलत नाही. हे सर्व याआधी आम्ही भोगले. त्यामुळे त्याचा आपल्याला अनुभव आहे. अशाही परिस्थितीत चिपळूणमध्ये दोनवेळा शिवसेनेचे आमदार विजयी झाले. जोपर्यंत मतदार आणि शिवसैनिक खंबीर आहेत तोपर्यंत कोणताही फरक पडणार नाही. सरकार येते आणि जाते. त्यात काही मोठे नाही. सर्व संघटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. संघटना उभारी घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते खंबीर आहेत आणि तशी आमच्यात धमक आहे, असे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT