कोकण

रत्नागिरी विशेष कारागृह स्वयंपाकघर झाले हायटेक

दिनेश चोरगे

रत्नागिरी; जान्हवी पाटील :  रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील स्वयंपाकघरची रचना पूर्णपणे बदलण्यात आली असून अत्याधुनिक साधनसाम्रगीचा याठिकाणी भरणा करण्यात आला आहे. एकाचवेळी 2 हजार चपात्या बनवणार्‍या मशिनसह इतर साहित्य स्वयंपाकघरात आणल्याने आता कमी वेळेत एकाचवेळी 300 बंदिवानांचा स्वयंपाक बनवला जात असल्याची जिल्हा विशेष कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी माहिती दिली.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात 250 पुरुष कैदी, 15 ओपन जेलचे कैदी, 15 महिला कैदी आहेत. या सगळ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी कैद्यांमधील लोकांची निवड केली जाते, याना या कामाचा मोबदला प्रशासनाकडून मिळतो. आता स्वयंपाकघरात आधुनिक साधन सामग्रीचा भरणा वाढत असताना कारागृहानेही कारागृह विभागाने यासाठी गतवर्षीच अर्ज करून अनेक सामग्री खरेदी केली यामध्ये चपाती मेकर, कुकर, भाजी कटींग मशिन्स, मिक्सर्स याशिवाय अन्य साहित्य घेण्यात आले आहे. यामुळे वेळेबरोबर मनुष्यबळाचीही बचत होत आहे.

जवळपास 300 कैद्यांचा स्वयंपाक करायचा असल्याने दररोज वेळापत्रक तयार केले जाते. आता मात्र फार कष्ट घ्यावे लागत नाही, काही ठराविकच कैदी या ठिकाणी काम करतात. नाश्ता असो वा जेवण प्रत्येक पदार्थ्याची चाचणी झाल्यावरच कैद्यांना द्यावे लागते ही चाचणी नियमितपणे कारागृह अधीक्षक करत असतात. किचनची जागाही वाढविण्यात आली असून नीटनीटकेपणा याठिकाणी दिसून येतो.

सेंद्रिय भाज्यांचाच वापर

किचनमध्ये कैद्यांकडून पिकवल्या जात असलेल्या सेंद्रिय भाज्यांचाच वापर या ठिकाणी केला जातो. त्यामुळे आता स्वच्छ आणि आरोग्यदायी भाज्या दररोज कैद्यांच्या जेवणात बनविल्या जात आहे. विविध पालेभाज्यांचा यामध्ये समावेश असल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT