संगमेश्वर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. 28 जुलै रोजी बुरंबाड येथील सर्वांत पुरातन इतिहास लाभलेल्या श्री आमणायेश्वर मंदिरात श्रमदान सामाजिक उपक्रम केले. 'एक तास गावासाठी' हा सामाजिक उपक्रम राबवून शाळेने एक आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना श्री आमणायेश्वर मंदिर, बुरंबाड येथे नेण्यात आले. दर्शनाचा कार्यक्रम उरकल्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेचच मंदिराच्या साफसफाईला सुरुवात केली. यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहशिक्षक अमोल भागडे, अनघा चव्हाण तसेच गायत्री साठे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी मंदिराच्या सभामंडपाची स्वच्छता केली तसेच मंदिराच्या आवारातील गवत साफ करण्यास सुरुवात केली. थोडा वेळ साफसफाई झाल्यानंतर मग विद्यार्थ्यांना विश्रांती देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व शाळेतील शिक्षिका तझीन मुकादम यांनी समजावून सांगितले.
भविष्यात देशासाठी कार्य करावयाचे असेल तर त्याची सुरुवात शालेय जीवनापासून होणे आवश्यक असल्याचे मत पुजारी मधुकर लिंगायत यांनी व्यक्त केले. या छोटेखानी कार्यक्रमासाठी मंदिराचे व्यवस्थापक भाई लिंगायत यांची परवानगी शाळेतील शिक्षक ओंकार मोहिते यांनी मिळवली. त्यांनीही तत्परतेने यास संमती दिली. यामुळेच 'एक तास गावासाठी' हा शाळेचा उपक्रम सफल झाला.
उपक्रमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी सुप्रिया पवार यांनी पार पाडली. अहवाल व वृत्तलेखन मयुरी करंजेकर यांनी केले. नमीरा शेकासन यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक पुन्हा शाळेत आले.