कोकण

रत्नागिरी रोजगार मेळाव्यात २ हजार १४० जणांना नोकरी

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या रोजगार महामेळाव्यात तब्बल २ हजार १४० जणांना नोकरी मिळाल्याची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागाच्या वतीने राज्यभर रोजगार महामेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पहिला रोजगार महामेळावा घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन ७ हजार ८०० युवक-युवतींनी नोंदणी केली होती तर जवळपास ३ हजार जणांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. नोंदणी झालेल्या जवळपास १० हजार उमेदवारांपैकी ४ हजार २२८ जणांच्या मुलाखती पार पडल्या. त्यातील २ हजार १४० जणांना नोकरीचे देकार (ऑफर लेटर ) प्रमाणपत्र अदा करण्यात आले.

२ हजार ८८ जणांना कौशल्य विकास विभागाकडे प्रशिक्षणासाठी वर्ग करण्यात आले. रोजगार मेळाव्यामध्ये रत्नागिरी, पुणे, सातारा, मुंबई येथील १३० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यापुढे राज्याच्या इतर भागातही अशा प्रकारचे रोजगार महामेळावे घेण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी जाहीर केले आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील रोजगार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेक दिव्यांग तरुण, तरुणी सहभागी झाले होते, त्यांना देखील नोकरी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT