खेड; पुढारी वृत्तसेवा : सतीश चिकणे यांचा राजीनामा : वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिली.
आगामी काळात कोणत्या पक्षातून काम करणार हे लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले. खेड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चिकणे यांच्यासोबत शहर सचिव तुषार सापटे उपस्थित होते.
यावेळी चिकणे म्हणाले की, मी राष्ट्रवादी पक्षाचे काम पक्ष स्थापनेपासून करत होतो. गेल्या चार वर्षांपासून माझ्याकडे पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. परंतु गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह बाजूला ठेऊन आघाडी झाली आणि तेव्हापासून मला शहराध्यक्ष म्हणून शहरात पक्ष वाढवण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी व नेते काम करू देत नाहीत.
गेल्या दीड वर्षांपासून पक्षात शहरातील राजकारणात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करून घेतले जात नसून अक्षरशः गळचेपी सुरू आहे. त्यामुळे हे शहराध्यक्ष पदाचे शोभेचे मुकुट मला आता नको असे मी पक्ष श्रेष्ठीना सांगून देखील त्यांनी कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळे मी दि. १ रोजी पक्षातील माझ्या सहकाऱ्यासोबत चर्चा करून पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शहरात राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते वाढवत आहेत असा समज पसरवला जात आहे. आगामी पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य व जिल्हा पातळीवरील राजकीय समिकरणांचा विचार न करता कोणतीच पावले खेड शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडून उचलली जात नसल्याची खंत श्री चिकणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षातुन आगामी कालावधीत काम करणार हे आपले राजकिय मित्र व कुटुंबियांसोबत आजच चर्चा करून जाहीर करणार असल्याचे श्री चिकणे यांनी यावेळी सांगितले.