खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला सातारा जिल्ह्याशी जोडणारा रघुवीर घाट दि. 1 जुलैपासून दोन महिने पर्यटनासाठी प्रशासनाने बंद केला आहे. पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पावसाळ्यात या घाटात अनेक स्थानिकांसह मुंबई पुणे येथील पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी येतात. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमध्ये घाटात अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या कड्यातून पाण्यासोबत मोठमोठे दगड व माती ढासळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपी गावातून सुरू होणार्या या घाटातील दहा कि.मी. परिसरातील रस्त्यावर काही ठिकाणी काम केले असले तरी अद्याप अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या घाटात वर्षा पर्यटनासाठी एक जुलैपासून बंदी घातली आहे. या बंदीनंतर पोलिस प्रशासनाने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी परतावे लागले.
घाटाच्या पायथ्याशी खोपी येथे खेड पोलिसांनी बॅरिकेडस् वापरून त्यावर सूचना फलक लावला आहे. याठिकाणी खासगी वाहनांची चौकशी करून पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी पाठविण्यात येत आहे. सद्यस्थितीत घाटात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना रोखण्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत तीन कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड होत असला तरी दरडी कोसळण्याचे प्रकार होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे.
मात्र, सातारा जिल्ह्यातील कादांटी खोर्यातील शिंदी, वळवण, मोरणी, अकल्पेसह 21 गावांना दळणवळणासाठी रघुवीर घाट एकमेव माध्यम आहे. यामुळे या सुमारे वीस ते पंचवीस गावांतील ग्रामस्थांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे. खेड आगारातून सुटणारी खेड-अकल्पे ही फेरी नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास मार्ग वाहतुकीला पूर्ववत करण्यासाठी एक जेसीबी व डंपर सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिला आहे.