कोकण

रत्नागिरी : ‘बाबा, मला मारू नका…!’ चिपळुणातील गणेशोत्सवात जिवंत देखाव्याने डोळे पाणावले

मोहन कारंडे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई गणेशोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सामाजिक संदेश देणारा जिवंत मानवी देखावा उभारण्यात आला आहे. स्त्रीभ्रूणहत्या या ज्वलंत विषयावर समाजाला संदेश देण्यासाठी मंडळाने या विषयाची निवड केली असून 'बाबा, मला मारू नका' अशी आर्त हाक मातेच्या पोटातील गर्भ समाजाला घालत आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

चिपळुणातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्ष धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करीत असते. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारण्यात येणारा देखावा हा कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. या मंडळाच्या वतीने दरवर्षी पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध विषयावर देखावे तयार केले जातात आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक संदेश दिला जातो. कोरोना महामारी आणि गेल्या वर्षी आलेला महापूर या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे येथील गणेशोत्सव साजरा झालेल्या नाही. या वर्षी मात्र मंडळाच्या वतीने जिवंत मानवी देखावा सादर करण्यात आला आहे.

सध्या स्त्रीभ्रूणहत्या हा ज्वलंत विषय आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेकांना आपल्याला मुलगाच व्हावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी देवधर्म, नवस, प्रसंगी अघोरी कृती देखील केली जातात आणि वंशाला दिवा हवा म्हणून प्रसंगी स्त्रीभ्रूणहत्या ही केली जाते. या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारा हा जिवंत देखावा आहे. अलिकडे अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळण्याचा प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे समाजात स्त्री आणि पुरुष जन्मदर यामध्ये मोठी तफावत निर्माण होत आहे. परिणामी भविष्यात मोठी सामाजिक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मंडळाने हा विषय गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजासमोर आणला आहे. दररोज सकाळी अकरा ते दुपारी एक व सायंकाळी 7 ते रात्री नऊ या वेळात हा देखावा सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे हा जिवंत मानवी देखावा असल्याने समोर एक घटना घडत असल्याचा भास होत असून लोकांना हा विषय भावला आहे. या जिवंत देखाव्याची निर्मिती व संकल्पना भरत गांगण यांची असून यामध्ये संगीता काटकर, अजय यादव, पूजा शिंदे, नाट्य कलाकार शिवाजी मालवणकर, अनंत शिगवण, आणि छोट्या मुलीच्या भूमिकेत परी शिरगावकर यांनी काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT