रत्नागिरी : परशुराम घाट 
कोकण

रत्नागिरी: परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद; अवजड वाहतूक कुंभार्ली घाटमार्गे

मोनिका क्षीरसागर

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत दरडी कोसळण्याचाधोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत परशुराम घाटातून कोणत्याही प्रकारचे वाहन जाणार नाही. घाट पूर्णपणे बंद केला असून लहान वाहनांना मात्र पर्यायी मार्ग दिला आहे, तर अवजड वाहनांसाठी कुंभार्ली घाटमार्गे पुणेअहमदाबाद रोडकडे जाता येणे शक्य आहे.

परशुराम घाटात अतिवृष्टीमुळे दोनवेळा दरडी कोसळल्या. त्यामुळे पेढे व परशुराममधील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार, खा. विनायक राऊत आदींनी पाहणी केली. अखेर दि. 9 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत घाट बंदचा निर्णय घेण्यात आला. हलक्या वाहनांना चिरणीमार्गे परवानगी दिली. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात घेऊन चिपळूणकडून खेडकडे येणार्‍या वाहनांसाठी कळंबस्तेआंबडस-शेल्डी-आवाशी हा मार्ग तर चिपळूणकडे जाणार्‍या हलक्या वाहनांसाठी पिरलोटे-चिरणी-आंबडसफाटा-कळंबस्ते फाटा अशी एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत परशुराम घाट मात्र वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे. गुरुवारी दिवसभर वाहतूक पोलिस लोटे व चिपळूणमध्ये अडकलेल्या वाहनचालकांना परशुराम घाट बंद असल्याचे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सांगत होते. बुधवारी सायंकाळी महामार्गावर अडकलेल्या वाहनांना देखरेखीखाली वाट मोकळी करून देण्यात आली. पावसाचा जोर ओसरला तरी परशुराम घाट बंद ठेवल्याने काही ठिकाणी अवजड वाहने यामध्ये कंटेनर, मोठे ट्रक अडकलेले दिसून येत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT