कोकण

रत्नागिरी : निकृष्ट कामामुळे चिपळूण-गुहागर मार्ग धोकादायक

मोहन कारंडे

गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात झालेले निकृष्ट काम आता मुसळधार पावसात सर्वांसमोर येत आहे. दर्जाहीन कामामुळे हा मार्ग धोकादायक बनल्याने वाहनचालक, नागरिक व प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठेकेदारानेही अशा निकृष्ट कामांना तात्पुरती मलमपट्टी करून सर्वकाही 'ओके' असल्याचे दाखवून दिले आहे.

नव्याने रुंदीकरण केलेल्या रस्त्याला तडे जाणे, गटारांचे स्लॅब कोसळणे, संरक्षक कठड्यांना भगदाड पडणे असे प्रकार गुहागर-विजापूर महामार्गावर सातत्याने घडत आहेत. गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरण सुरुवातीपासूनच वादात सापडलेले आहे. एखाद्या ठिकाणी काम सुरु करायचे आणि तेथील अर्धवट काम टाकून दुसरीकडे सुरू करायचे असा पायंडा ठेकेदाराने आजपर्यंत पाडलेला दिसून येत आहे. रामपूर ते गुहागर अशा टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. या कालावधीत ठेकेदाराच्या अजब कामाचे नमुने अनेकांना पाहायला मिळाले. गेल्यावर्षी मार्गताम्हाने सुतारवाडी येथे नदीवरील बांधलेला पूल हा नदीचा प्रवाह बदलून बांधला गेला होता. त्यावेळी नागरिकांनी ओरड करताच ठेकेदाराने स्वतःची बाजू सुरक्षित करुन नदीच्या एका बाजूने भली मोठी संरक्षक भिंत बांधून दिली. मात्र, मार्गताम्हाने येथील पद्मावती पुलाजवळ नदीच्या दोनही बाजूने संरक्षक भिंत बांधून देण्यास नकार दिला.

गिमवी-देवघर मार्गावर रस्त्यावरील नव्या काँक्रीटला मोठे लांबलचक तडे गेले होते. त्याची ओरड होताच ठेकेदाराने सिमेंटने हे तडे भरले. शृंगारतळी येथे रस्त्याच्या दोनही बाजूने बांधलेल्या गटारांचा स्लॅबच कोसळला. काही ठिकाणी गटारांच्या भिंती तुटून सळ्या बाहेर दिसू लागल्या. येथेही गटारांचे बांधकाम अर्धवट टाकल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन शृंगारतळी बाजारपेठ चिखलाने माखली होती. मोडकाघर येथील पुलाच्या एका बाजूच्या भिंतीलाच उभा मोठा तडा गेला होता. मार्गताम्हाने येथील पद्मावती नदी पुलाजवळील एका गटाराच्या काँक्रीटलाच भगदाड पडून त्यामध्ये जेसीबी आत गेला होता. पुलाच्या दोनही बाजूने दोनवेळा रस्त्याच्या काँक्रीटला तडे जाण्याचे प्रकार सुरुच आहेत. येथे तडे गेलेला काँक्रीटचा भाग काढण्यात येऊन तेथे तात्पुरती खडीगोटे आणून टाकण्यात आले आहेत. आता येथे नव्या जागेवर तडे गेलेले दिसून येत आहेत. जोडरस्तेही थातूरमातूर केले गेले आहेत. निकृष्ट कामांबाबत महामार्ग अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. काहींनी फोनही करुन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. मात्र, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत ठेकेदार, अधिकारी यांनी तक्रारींच्या पत्रांना केराची टोपलीच दाखविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT