कोकण

रत्नागिरी : ‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांचा वॉच!

मोहन कारंडे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. विशेषत: दापोली, गुहागर तसेच गणपतीपुळे येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्तही वाढवण्यात आला असून, वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांची जादा कुमक ठेवून वाहनचालकांची तपासणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. थर्टी फर्स्टपर्यंत ही संख्या वाढेल. जिल्ह्यात दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत.? गणपतीपुळे येथून रत्नागिरी व पावसकडे येणार्‍या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. किनार्‍याकडील भागाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे.

या कालावधीत पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिस कर्मचारी नेमले जाणार आहेत. समुद्रकिनार्‍यावरती धोकादायक ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार असून, ग्रामीण भागात पोलिसपाटील आणि ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे. येणार्‍या पर्यटक महिलांच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जाणार आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात मद्यालये रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने रात्रीच्यावेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मद्यप्राशन करुन वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट आदेश अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत. पर्यटनस्थळे व रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धार्मिक पर्यटनस्थळे व गडकिल्ल्यांवरही पोलिस विशेष लक्ष देणार असल्याचेही धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT