कोकण

रत्नागिरी : जिल्ह्यातच वर्षा पर्यटनासाठी बंदी का? प्रशासनाच्या सरसकट बंदीविरोधात तीव्र नाराजी

मोहन कारंडे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात कोकणात निसर्ग बहरतो. नदी-नाल्यांची खळखळ… ओसंडून वाहणारे धबधबे… सर्वत्र दिसणारी हिरवळ आणि गर्द झाडी… यामुळे कोकणातील पाऊस हा सर्वांनाच आवडतो. मात्र, गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर बंदी घातली जात आहे. शेजारील जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आमंत्रण दिले जात असताना मात्र फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच वर्षा पर्यटन बंद का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कोकणचा पावसाळा अनेकांना आवडीचा आहे. अलिकडच्या काही दिवसांत वर्षा पर्यटनासाठी कोकणात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सर्वत्र दिसणारी हिरवळ, हिरवीगार झालेली झाडे, झोडपणारा पाऊस आणि नदीनाल्यांची खळखळ, शिवाय कड्यावरून कोसळणारे धबधबे हे अनेकांना आकर्षित करीत असतात. हिवाळा आणि उन्हाळ्यात कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षून घेत असतात. मात्र, अलिकडच्या काही दिवसांत पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची संख्या वाढती आहे. कोकणात येण्यासाठी असलेले नागामोडी घाट हे देखील आकर्षण आहे. मात्र, अशाचवेळी प्रशासनाकडून गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर सर्रासपणे बंदी घातली जाते. वर्षा पर्यटनासाठी काही निर्बंध लावणे जरूरीचे असताना सरसकट ठिकाणी बंदीच केली जाते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. वास्तविक, वर्षा पर्यटनातून कोकणात आर्थिक उत्पन्न निर्माण होऊ शकते. मात्र, ते या बंदीमुळे ठप्प होत आहे.

फक्त रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास केवळ जिल्ह्यातीलच वर्षा पर्यटनस्थळावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. संबंधित तहसीलदार, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडून ही बेकायदेशिरपणे बंदी लागू करण्यात आली आहे. लगतचा सिंधुदुर्ग, रायगड, सातारा या जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांना एकप्रकारे निमंत्रणच दिले जात आहे. त्या-त्या ठिकाणचे पर्यटन महामंडळाचे अधिकारी वर्षा पर्यटनासाठी या असे सांगून अशा स्थळांची प्रसिद्धीच करीत आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात अशा ठिकाणांवर बंदी घालून येथील अर्थकारणालाच खीळ घातली जात आहे.

या वर्षीचा विचार केल्यास रघुवीर घाट, सवतसडा या बरोबरच ठिकठिकाणचे धबधबे, धरण परिसर अशा महत्त्वाच्या वर्षा पर्यटनाच्या स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांचा तर हिरमोड होत आहे. याशिवाय तेथील छोट्या व्यावसायिकांवर देखील परिणाम झाला आहे. रघुवीर घाट पूर्णपणे बंद ठेवल्याने येथील व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला असून दरवर्षी या ठिकाणी वर्षा सहलीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, यावर्षी सरसकट बंदी घातल्याने हा मार्गच बंद केल्याने निसर्गाचा आस्वाद घ्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

वास्तविक बंदीपेक्षा निर्बंध घालणे जरूरीचे आहे. म्हणजेच कोकणात वर्षा पर्यटन अधिक बहरेल आणि अर्थव्यवस्थेला देखील गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, प्रशासन सरसकट बंदी घालत असल्याने तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने विचार करावा. लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. हा काळ वर्षा पर्यटनासाठी महत्त्वाचा असतो. नागेश्वरी, मार्लेश्वर येथेही पर्यटक पावसाळ्यात येत असतात. आवश्यक ती खबरदारी घेऊन आणि निर्बंध घालून अशी ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करावीत, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT