रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पावसाने बुधवारी थोडी उसंत घेतल्याने मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेली पूरस्थिती सुधारण्यास मदत झाली. मंगळवारी पावसाच्या सातत्याने जिल्ह्यातील चारही प्रमुख नद्या इशारा पातळीबाहेर वाहू लागल्या होत्या. मात्र, पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने नद्यातील पाणी ओसरले असले तरी खेडमध्ये जगबुडी धोका पातळीच्या वर तर कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत होती. पावसाचा जोर लक्षात घेत जिल्ह्यातील 159 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आगामी तीन दिवस अतिवृष्टीचे राहणार असल्याने सतर्कतेसाठी हवामान विभागाने शनिवारपर्यंत 'रेड अलर्ट' कायम ठेवला आहे. आगामी काळात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करताना प्रशासनाने एनडीआरएफची आणखी एक तुकडी आता खेड तालुक्यातही तैनात केली आहे.
बुधवारी सकाळी पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली तर काही भागात पावसाचा जोरही ओसरलेला राहिला. बुधवारी संपलेल्या 24 तासात 158 मि. मी.च्या सरासरीने 1423 मि.मी. पाऊस झाला. बहुतांश तालुक्यात दीडशेहून अधिक मि. मी. पावसाची नोंद झाली.सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात झाला. त्यामुळे दापोली तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले होते. मंडणगड तालुक्यातही 200 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुहागर तालुक्यातही जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.
रत्नागिरी तालुक्याचा अपवाद वगळता बहुतांश तालुक्यात पावसाने दीडशेची मजल गाठली होती. जिल्ह्यात आतापर्यंत 1137 मि.मी.च्या सरासरीने पावसाने दहा हजारी मजल गाठली आहे. गतवर्षीही या कालावधित पावसाने दहा हजाराचा टप्पा पूर्ण केला होता.
कोकण किनारपट्टी भागातील बहुतांश जिल्हे पाऊस व्याप्त झाले असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात 9 जुलैेपर्यंत अतिवृष्टीसह 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील जगबुडीचा जलस्तर बुधवारी धोेका पातळीच्या वर गेला. जगबुडीची धोका पातळी 7 मिटर आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता जगबुडीचा स्तर 7.20 मिटरने वाढला होता. संभाव्य आपत्तीची तिव्रता लक्षात घेता प्रशासनाने आता चिपळूण आणि खेड येथे प्रत्येकी एक एनडीआरएफची कुमक तैनात केली आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन जिल्ह्यातील दरड आणि पूरप्रवण क्षेत्रातील 159 कुटुंबातील 505 जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 83 घरांचे अंशतः तर पाच घरांचे पूर्णत: नकसान झाले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले. मुंबई- गोवा महामार्गावर पर्शुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली.
कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने येथील वाहतूक बाधीत झाली. मात्र, प्रशासनाने प्रयत्न करुन दरड हटवल्याने हा मार्ग मोकळा झाला. या भागात प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. खेड तालुक्यात नातूनगर येथेही दरड कोसळून वाहतुक बंद झाली.
दरम्यान, आगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रात आणि संभाव्य पूरसदृष्य भागात सावधगिरी आणि सतर्कता बाळगली आहे. तसेच किनारी गावांना सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत.
एस. टी. पर्यायी मार्गाने वळवली
परशुराम घाट बंद असल्याने एस. टी.ची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मुंबईकडून येताना गुणदे, शेल्डीमार्गे चिपळूण तर चिपळूणकडून जाताना आंबडस, चिरणी मार्गे लोटे अशा मार्गावर एस.टी.ची वाहतूक वळविण्यात आली आहे आणि परशुराम घाटाला पर्याय काढण्यात आला आहे. परशुराम घाटाचे काम सुरू असताना हा घाटही बंद ठेवण्यात आला होता. या कालावधीत तब्बल एक महिना मुंबई-गोवा महामार्गावर एस.टी. सेवा ठप्प होती. यावेळी दै. 'पुढारी'ने हा पर्यायी मार्ग सुचविला होता. आता पावसाळ्यात घाट बंद असताना हाच पर्याय प्रशासनाने स्वीकारला असून मुंबई-गोवा महामार्गावरील एस.टी.ची सेवा यामुळे पर्यायी मार्गाने सुरळीत झाली आहे.
महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा परशुराम घाट रेड अलर्ट असेपर्यंत अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आल्याने या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. फक्त हलकी वाहने चिरणीमार्गे वळविण्यात आली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर लोटे, कापसाळ, गुहागर बायपास रोड या भागात अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कंटेनर, ट्रक अशी अनेक वाहने महामार्गावर रांगा लावून आहेत. यामध्ये असणारे चालक, क्लिनर यांचे हाल होत असून त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या वाहनांसाठी कुंभार्ली घाट हा पर्याय देखील आहे. मात्र, अनेकजण परशुराम घाट सुरू होईल, या अपेक्षेने थांबून आहेत.