कोकण

रत्नागिरी : जलवाहिनी दुरुस्ती खर्च ठेकेदाराकडून वसूल करणार; रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाचा निर्णय

मोहन कारंडे

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेची जलवाहिनी रोजच्या रोज कुठेना कुठे फुटत आहे. सततची ही दुरूस्ती करून थकलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाने दुरुस्तीबाबतचा आलेला सर्व खर्च योजनेच्या ठेकेदार कंपनीकडून वसूल करण्याचे निश्चित केले आहे. मंगळवारी जेलसमोर जलवाहिनी फुटली.

रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. परंतु, गेले अनेक महिने अंतर्गत जलवाहिनी वरचेवर कुठे ना कुठे तरी फुटतच आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी त्या-त्या ठिकाणचे रस्ते खोदावे लागत आहेत. या खोदाईसाठी पाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीकडून गळती काढण्याच्या साहित्याव्यतिरिक्त काहीही दिले जात नाही. त्यामुळे रस्ता खोदाईसाठी रत्नागिरी नगर परिषदेला जेसीबीसह मनुष्यबळही पुरवावे लागत आहे. शहरात गेल्या सहा ते सात महिन्यात किमान एक दिवसाआड करून तरी कुठेना कुठे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. दोष निवारण दायित्व कालावधी बाकी असल्याने यासंदर्भात ठेकेदार कंपनीला दुरुस्तीची सूचना करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाणी विभागाकडून सांगण्यात आले.

अत्यावश्यक सेवा असल्याने ही दुरूस्ती तातडीने करून घेण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा रनपलाच उपलब्ध करून द्यावी लागत आहे. ठेकेदार कंपनीकडून केवळ गळती काढण्याचे साहित्य पुरवले जात असल्याचेही पाणी विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेतील शिळ पंप हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पंपींग हाऊस, पानवल ग्रॅव्हीटी आदी कामे शिल्लक आहेत. ६२ कोटी रूपयांची योजना असून, झालेल्या कामापोटी ठेकेदार कंपनीला सुमारे ४८ कोटी रूपये देण्यात आले आहेत. उर्वरित राहिलेल्या रकमेतून रनपच्या पाणी विभागाकडून जी दुरुस्ती केली जात आहे त्याचा खर्च वळता करून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT