चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यावेळी अनेकांच्या महत्त्वाकांक्षेत असलेला पेढे गण यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. आरक्षण सोडत जाहीर होताच पं. स. मध्ये आलेले अनेकजण अपेक्षित आरक्षण न पडल्याने नाराज झाले व आपला हिरमोड ते चेहर्यावर लपवू शकले नाहीत.
चिपळूण पं. स.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवार, दि.28 रोजी सकाळी आरक्षण सोडत जाहीर झाली. प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी घाटगेपाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. यावेळी चिपळूण पं. स. मध्ये दोन गण वाढले असून, एकूण वीस गण झाले आहेत.
यापूर्वी ते अठरा होते. या वीस गणांची आरक्षण सोडत तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी जाहीर केली. पेढे गण अनुसूचित जाती प्रवर्ग, भोम, शिरळ, दळवटणे, कापसाळ, वहाळ, मूर्तवडे आणि कुटरे या सात जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. तर पिंपळी खुर्द, अलोरे, पिंपळी बु., कोंडमळा, सावर्डे, निवळी, कोकरे अशा सात ठिकाणी सर्वसाधारण कुणीही उमेदवार उभा राहू शकतो. शिरगाव, खेर्डी, वाघिवरे या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी हे तीन गण आरक्षित झाले आहेत. उमरोली व दहिवली बु. हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. या गणात पुरुष अथवा महिला निवडणूक लढविणार आहेत.
या आरक्षण सोडतीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, आरपीआयचे राजू जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, दिलीप चव्हाण, रुपेश घाग, शरद शिगवण आदी उपस्थित होते. आरक्षण सोडत सात वर्षांच्या मुक्ता साळुंखे हिने चिठ्ठीद्वारे काढली.
वीसपैकी दहा जागा महिलासांठी आरक्षित
एकूण वीस जागांपैकी दहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामुळे काही सदस्यांचे पत्ते कापले गेले आहेत. यामध्ये पं. स.साठी इच्छुक असणारे रूपेश घाग, जयंद्रथ खताते व अन्य इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. बहुचर्चित खेर्डी गण नामाप्र महिलेसाठी आरक्षण झाल्याने या गटात असलेली मोठी चुरस आता महिलांमध्ये होणार आहे.