खेड; पुढारी वृत्तसेवा : शनिवार, दि. 6 रोजी परतलेल्या पावसाने दोन दिवस खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांची पाण्याची पातळीत धोकादायक पद्धतीने वाढत आहे. सायंकाळी जगबुडी नदीने 6.85 मीटर पातळी गाठली आहे. चोवीस तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
खेड तालुक्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुवाँधार पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले काही ठिकाणी रस्त्याला दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या तर काही ठिकाणी वृक्ष उन्मंळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण भागात वीज वाहिन्यांवर झाड्यांच्या फांद्या मोडून पडल्याने काही गावांचा वीजपुरवठा देखील खाडीत झाला होता. 15 जुलै पर्यंत तालुक्यात पावसाचा धिंगाणा सुरू होता. मात्र, 16 जुलै पासून पावसाने अचानक विश्रांती घेतली आणि जवजजवळ पंधरा दिवसाने तालुकावासीयांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले.
16 जुलै पासून गायब झालेले पाऊस शनिवार, दि. 6 ऑगस्टपर्यंत उगवलाच नव्हता त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढू लागली होती. शेतात केलीली लावणी फुकट जाण्याच्या भीतीने शेजारी हवालदिल झाले होते. कधी एकदा पावसाचे पुनरागम होत आणि धोक्यात आलेली शेती वाचते हा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. त्यामुळे शेतकरी वरुणाचा प्रार्थना करू लागले होते. अखेर वरुणने शेतकर्यांची प्रार्थना ऐकली आणि शनिवारपासून खेड तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागम झाले.
शनिवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी सुरु झालेल्या पावसाचा जोर दुपारी वाढला आणि खेड शहरालगत वाहणारी जगबुडी आणि खेड दापोली मार्गावरील नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. रविवार, दि 7 रोजी पावसाचा जोर कायम असल्याने या दोन्ही नद्यांना पूर येण्याची भीती व्यक्त होत असल्याने शहरातील व्यावसायिक आणि नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या ईशारा प्रशासनाने दिला आहे. तालुक्यात एकूण 1684 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ग्रामीण भागातील नद्या, नालेदेखील दुथडी भरून वाहू लागले असल्याने शेतीच्या कामासाठी बाहेर जाणार्या शेतकर्यांनी नदी- नाले ओलांडताना खबरदारी घ्यावी अशे आवाहन करण्यात आले आहे. खेड शहरालगत वाहणार्या जगबुडी नदीचा उगम हा सह्याद्रीच्या खोर्यात वसलेल्या गावामध्ये होतो, त्यामुळे जेव्हा सह्याद्रीच्या खोर्यात जोरदार पाऊस होतो त्यावेळी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढते. त्याच दरम्यान जर समुद्राला भरती आली तर नदीच्या पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी खेड शहरातील मटण मच्छी मार्केट येथून शहरात घुसते. त्यामुळे पावसाळ्यात येथील व्यावसायिकांना सतर्क रहावे लागते. जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा शहराला कधी वेढा पडले याचा काहीच नेम नसल्याने पावसाचा जोर वाढला कि खेड शहरातील व्यापार्यांना आपल्या दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात करावी लागते.
शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काही गावांना जोडणार्या रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धोकादायक खड्डे
खेड तालुक्यातील असगाणी गावाला जोडणार्या रस्त्यावर ओद्योगिक वसाहतीच्या कामामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने हा मार्गावरून वाहने हाकताना चालकांचा कास लागत आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आदळून वाहनाचे नुकसानदेखील होऊ लागले आहे.