रत्नागिरी ः शहरातील किल्‍ला येथे बसवण्यात आलेल्या पथदीपाचा तुटलेला एलईडी, दुसर्‍या छायाचित्रात जुन्या डीपी न काढता तशाच ठेवण्यात आल्या आहेत. 
कोकण

रत्नागिरी : काम अपूर्ण तरीही वीज वाहिनी लोकार्पणाचा घाट

Shambhuraj Pachindre

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट (एन.सी.आर.एम.पी.) अंतर्गत, किनारपट्टीभागात भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम अद्याप पूर्णत्वाला गेले नसतानाही महावितरणने उर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणाचा घाट घातला आहे. भूमिगत वाहिन्या टाकताना व त्यांचे डीपी बसवताना अनेक ठिकाणी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात वाहणार्‍या जोरदार वार्‍यामुळे किनारपट्टी भागात वीज वाहिनीवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. यावर उपाय म्हणून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला. 15 ऑक्टोबर 2019 ते 14 एप्रिल 2021पर्यंत या कामाची मुदत ठरवण्यात आली. परंतु, कोरोनामुळे या कामाला मोठा फटका बसला. कोरोनाचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा कामाला जोमाने सुरुवात झाली. मात्र, खोदाईसाठी लागणार्‍या परवानगीला होणारा विलंब आणि निधीची कमतरता, यामुळे या वीज वाहिन्या टाकण्याचे काम रडत खडतच सुरू आहे. मार्च 2022 ची अंतिम मुदत असतानाही अद्याप सुमारे 60 टक्केच काम झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात चक्रीवादळासह जोराने वारे वाहतात. यातून झाडे पडून वीज वाहिन्या तुटतात. खांब वाकतात, यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पूर्वी आलेल्या निसर्ग, तोक्‍ते वादळामुळे वीजपुरवठा अनेक दिवस खंडित होण्याबरोबरच महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट (एन.सी.आर.एम.पी.) अंतर्गत किनारपट्टीभागात भूमिगत वीज वाहिनी टाकण्याच्या 96.96 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

यातून रत्नागिरी शहर आणि नजिकच्या शिरगाव, मिर्‍या आणि कर्ला गावात भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम करताना रस्त्यानजिक चर खोदून त्यामध्ये केबल टाकण्यात येते. सद्य परिस्थितील शहरानजीकच्या शिरगाव गावात हे काम पूर्ण झाले आहे. येथील भूमिगत वाहिनीची चाचणीही घेण्यात आली असून, ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मात्र, किल्‍ला, भगवती मंदिर, दीपगृह, मांडवी, कर्ला येथील काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. रत्नागिरी शहरात काम जवळपास पूर्णत्वाला गेले असले तरी काही भागात चाचण्या झालेल्या नाहीत.

गटारांवर डीपी उभारण्यात आल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शहरातील किल्‍ला परिसरात काही वर्षांपूर्वीही भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली. मात्र, काही महिन्यातच यातून होणारा वीजपुरवठा बंद झाला. सध्या यातून कोणतीही वीज प्रवाहित नसली तरी रस्त्यावर बसवण्यात आलेले बॉक्स तसेच ठेवण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील खार्‍या हवेमुळे पत्र्याचे हे बॉक्स गंजले असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. झडपे मोडून पडली आहेत. गंजलेल्या पत्र्याचा काही भाग रस्त्यावरच पडलेला असून, यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नव्या योजनेंतर्गत बसवण्यात येणारे बॉक्सही पत्र्याचेच असल्याने त्याच्या टिकाऊपणाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

किनारपट्टी भागात भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम रडतखडत; सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT