रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) राज्य भरारी पथकाने चिपळुणातील वालोपे येथे एका गोडावूनवर छापा मारला. गोडावून मालकाने त्या भरारी पथकातील गणवेशात नसलेल्या अधिकार्यांकडे ओळखपत्र, वॉरंट, शासकीय डायरी दाखवण्यास सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला चिपळुणातील राजू नामक मद्यव्यावसायिकाचे गोडावून दाखवतो चला, असे सांगितल्यानंतर त्या पथकाने तेथून अक्षरश: पळ काढला. या पथकात खासगी व्यक्तीही दिसून आल्याने हे भरारी पथक खरे होते की तोतया? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
रविवारी सकाळी पाच जणांचे एक पथक सफेद रंगाच्या इर्टिकाने चिपळूणातील वालोपे येथे देवळेकर यांच्या गोडावूनजवळ आले. आम्ही राज्य भरारी पथक असून गोडावूनमध्ये गोवा बनावटीचे मद्य आहे. त्यामुळे कारवाईसाठी या गोडावूनचे कुलूप उघडून दाखवावे, असे सांगण्यात आले. गोडावून मालक देवळेकर यांना त्या पथकात खासगी व्यक्ती असल्याचे जाणवले. त्यामुळे देवळेकर यांनी या पथकात असलेल्या साध्या वेषातील व्यक्तींना नाव विचारले. त्यातील एकाचे जानकर असे नाव समजले. दुसरी एक व्यक्ती चिपळुणातच वावरणारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून देवळेकर मद्य व्यवसायात असल्याने त्यांना राज्य उत्पादन शुल्कमधील बहुसंख्यांची नावे माहित होती. त्यामुळे त्यांनी सर्वांनाच नावे विचारण्यास सुरुवात केली. नावे सांगताना गोंधळ उडाला असतानाच ओळखपत्रे दाखवा, गोडावूनवर छापा मारण्यासाठी वॉरंट आहे का? शासकीय डायरी सोबत आहे का, असे प्रश्न भरारी पथकातील अधिकार्यांना विचारण्यात आले. ही माहिती दिल्यानंतरच कुलुप उघडले जाईल, असा पवित्रा गोडावून मालकाकडून घेण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्या सोबत एक व्यक्ती मद्य व्यवसायातीलच असावी, असा अंदाज आल्यानंतर देवळेकर यांनी तुम्हाला मोठी रेड करायची असेल तर 'राजूचे गोडावून दाखवतो चला, तेथे तुम्हाला गोवा बनावटीचे मद्य मोठ्या प्रमाणात मिळेल' असे सांगितल्यानंतर त्या पथकाने तेथून पळ काढला. राज्य उत्पादन शुल्कचे राज्य भरारी पथकाची वालोपेतील कारवाई फसल्यानंतर या पथकाने अनेक हातभट्टीवाल्यांसह मद्य व्यवसायिकांना बोलावून घेतले. परंतु रविवारच्या संपूर्ण दिवसात कोणतीही अधिकृत कारवाई झाली नाही. त्यामुळे हे पथक खरे होते की तोतया? खरोखर कारवाईसाठी आले होते की वसुली हेतू साध्य करण्यासाठी याबाबत जिल्ह्यातील मद्य व्यवसायिकांमध्ये चर्चा सुरू होती.