कोकण

रत्नागिरी : आरक्षणानंतर राजापूर तालुक्यात पक्षांतर्गत स्पर्धा

मोहन कारंडे

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परीषदेसह पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या आरक्षणानंतर आता तालुक्यातील प्रत्येक पक्षांतर्गत जोरदार स्पर्धा सुरु झाली असुन इच्छुकांनी तर पुढील मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. दरम्यान, नव्या रचनेत रद्द झालेले पहिले गट आणि गण व नव्या प्रभागात सामावेश झाल्यानंतर तेथे पडलेले प्रतिकूल आरक्षण यामुळे काही इच्छुकांच्या आशांवर पाणी फेरल्यामुळे आपली सोय अन्य प्रभागांत होते का, याचीही चाचपणी सुरु केल्याने निवडणूक काळात वाढणारी मोठी स्पर्धा तालुकावासीयांना पहायला मिळणार आहे.

तालुक्यात नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे चौदा गण अस्तित्वात आले आहेत. त्याचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. त्यानुसार विविध पक्षांच्या काहींच्या ते पत्थ्यावर पडले तर काहींच्या पदरी घोर निराशा पडली. तालुक्यातील नव्या प्रभाग रचनेत झालेले बदल, गावांची झालेली अदलाबदल प्रत्येक पक्षांचे बलाबल, त्याचा होणारा राजकीय लाभ याची गणिते गेले काही दिवस मांडली जात होती. त्यातूनच जाहीर होणारे आरक्षण यावरच सर्व गणिते विसंबून राहिली असतानाच गुरुवारी सात जिल्हा परिषद गट व चौदा पं. स. गण असे एकवीस जागांचे आरक्षण जाहीर झाले.

जाहीर झालेल्या आरक्षणानंतर पत्ता कट झालेल्या अनेक इच्छुकांचे मनसुबे पुढील 5 वर्षांसाठी धुळीला मिळाले आहेत. जि. प. च्या सातपैकी प्रत्येकी दोन गट सर्वसाधारण स्त्री (ताम्हाने, तळवडे) दोन सर्वसाधारण (केळवली, कशेळी, जुवाठी )आणि दोन नागरीकांच्या मागास प्रवर्गामध्ये साखरीनाटे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आणि कातळी नागरिकांचा मागास प्रवर्ग) असे आरक्षण पडले आहे. यामध्ये सर्वसाधारणचे तीन गट असलेल्या केळवली व कशेळी व जुवाटी गटात जोरदार स्पर्धा पहावयास मिळत आहे. तालुक्यातील सर्व पक्षांतील दिग्गज या दोन गटात असल्याने विविध पक्षांबरोबरच पक्षांतर्गत कमालीची स्पर्धा येथे पहावयास मिळत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या कातळी जि.प. गटातदेखील जोरदार स्पर्धा असून महिलांसाठी असलेल्या दोन सर्वसाधारण गटांसह एक ओबीसी असलेल्या गटातदेखील तेवढीच स्पर्धा महिलान्मध्ये पहावयास मिळत आहे. अनेक महिला निवडणूक लढविण्यासाठी जोरदार इच्छुक असल्याचे समजते.

या पूर्वी राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद महिला सदस्याला जि.प. अध्यक्षपदासह महिला बालकल्याण सभापती पदे भुषवायची संधी लाभली होती. तर पंचायत समितीमध्येदेखील सभापती व उपसभापती पदे महिलांनी यशस्वीपणे सांभाळल्याने महिला वर्गही तेवढ्याच ताकदीने निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज आहे. काही इच्छुक उमेदवारांच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाले असले तरी स्पर्धेमुळे उमेदवारी मिळण्याची संधी कितपत असेल याची शाश्वती नसल्याने काही जणांनी आतापासूनच आपली व्यूहरचनेला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेत रद्द झालेला गट वा गण असो किंवा जाहीर आरक्षण असो ज्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांनी आता दुसरा गट किंवा गणात सोय लागते का त्याचेही अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे. तर काहींनी महिला आरक्षण पडलेल्या जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समितीच्या गणातून आता पत्नी, मुलगी, सून यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय रिंगणात सुरु आहे. राजकीय क्षेत्रात घराणेशाहीवर सर्रासपणे टीका होत असली तरी तालुक्यात मात्र घराणेशाही रेटून नेण्याचेही प्रकार तालुक्यात घडत आहेत.

SCROLL FOR NEXT