राजापूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यामध्ये हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर १ डिसेंबरपासून टोलवसुली सुरू करण्यात येणार होती. मात्र, खात्रीलायक वृत्तानुसार, आता सोमवार, दि. ५ डिसेंबरपासून टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. या टोल वसुलीचे कंत्राट एमटी करीमुनिसा या कंपनीकडे देण्यात आले आहे. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी अद्याप पूर्ण झालेले नसताना शासन टोल वसुली सुरू करणार असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल आकारणी करण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील राजापूर तालुक्याच्या हद्दीत हातिवले येथे टोलनाका उभारला आहे. टोलनाक्याचे काम पूर्ण झाले असून, टोल वसुलीचे कंत्राट एमटी करीमुनिसा या कंपनीला देण्यात आले आहे. यापूर्वी १ जूनपासून या टोलनाक्यावर टोल वसुलीला सुरुवात होणार होती. मात्र, सर्वपक्षीयांनी त्यावेळी विरोध दर्शविल्यामुळे टोल वसुली सुरू केली नव्हती. त्यानंतर संबंधित कंपनीला पोलिस कुमक घेत टोल वसुलीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यावेळीही जोरदारपणे विरोध झाल्याने टोल वसुलीला स्थगिती दिली. मात्र आता पुन्हा टोल वसुलीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हातिवले येथे टोल वसुली करताना टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे, तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट दिली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे 'फास्ट टॅग' असलेल्या वाहनांना टोलची ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
टोल वसुली करताना या पूर्वी जीप, व्हॅन, कार यांना एकवेळच्या प्रवासासाठी ८५ रुपये, रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १२५ रुपये, हलकी व्यावसायिक वाहने / मोठी मालवाहू वाहने आणि मिनीबससाठी १३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी २०० रुपये, ट्रक आणि बससाठी (डबल क्सल) २८० रुपये, रिटर्न जर्नीसाठी ४२५ रुपये, ट्रक आणि बस (ट्रिपल क्सल) ३१० रुपये, रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये, अवजड (४ ते ६ क्सल) वाहनांसाठी ४४५ रूपये, रिटर्न ६६५ रूपये, मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी ५४० रूपये तर रिटर्न ८१० रूपये अशा प्रकारे दर लावण्यात आले होते. जिल्ह्यातील नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी ५० टक्के सवलत तर स्थानिक वाहतुकीकरीता ३१५ रूपये मासिक पास देण्यात येणार आहे.
काही ठिकाणी अद्यापही महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे याला विरोध होण्याची जोरदार शक्यता आहे. त्यामुळे ५ डिसेंबरपासून टोल सुरु झाल्यास हातिवले टोल नाक्यावर संघर्ष होण्याची चिन्हे आहेत