कोकण

माजी राज्यमंत्री हुसेन दलवाई यांचे निधन

Arun Patil

चिपळूण : माजी राज्य न्याय मंत्री व माजी राज्यसभा खासदार आणि खेडचे माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यू समयी 99 वर्षांचे होते. एका समाजवादी व काँग्रेसी विचारांच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते चिपळूण शहरालगतच्या मिरजोळी गावचे मूळचे रहिवासी होते.

खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली व आमदार म्हणून काम केले. याच काळात राज्यात त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. हुसेन मिश्रीखान दलवाई हे केंद्रामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून दोन वेळा निवडून गेले.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले होते. ते एकदा लोकसभेसाठी खासदार म्हणून तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले. सर्वधर्म समभावाच्या माध्यमातून त्यांनी समाजवाद जोपासला आणि काँग्रेस विचारांशी ते एकनिष्ठ राहिले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोकणात अनेक विकासकामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे व मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT