मंडणगड ; पुढारी वृत्तसेवा : मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रकियेत बुधवारी 13 प्रभागांकरिता मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. 13 जागांकरिता 35 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शहरातील 2215 पात्र मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अपेक्षित होते. यात 1116 महिला व 1099 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 13 प्रभागातील मतदारांनी 1702 मतदानाचा हक्क बजावला. यात 850 महिला व 852 पुरुष मतदारांचा समावेश असून मतदानाची सरासरी टक्केवारी 86.02 टक्के इतकी आहे. या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी 2022 रोजी लागणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था करण्यात आलेली होता. शहारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये प्रभाग क्रमांक 1,2, 4, 12, 13, 14, 15, 16, 17 या 9 प्रभागांची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. नूतन विद्यामंदिर मंडणगड येथे प्रभाग क्रमांक 8 व 5 या दोन प्रभागांची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. गांधी चौक येथील जि.प. मराठी शाळेत प्रभाग क्रमांक 11 करिता मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते तर कोंझर येथील जि.प. मराठी शाळेत प्रभाग क्रमांक 10 करिता मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते.
सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी मंडणगड शहारात दोन दिवसांपासून दाखल झालेले असल्याने मतदान केंद्रे व परिसरास पोलिस छावणीचे रुप आले होते. सर्व ठिकाणी मतदान केंद्राचे 200 मीटरचे अंतरात वाहने व मतदारासोडून अन्य व्यक्तींना प्रवेश निशीध्द करण्यात आला होता. मतदान प्रक्रियेकरिता सार्वजनिक सुट्टी देण्यात आली होती याचबरोबर बाजारपेठही पुर्णपणे बंद असलेली दिसून आली.
मतदानासाठी 1 पोलिस निरिक्षक 5 पोलिस उपनिरिक्षक, 54 पोलीस कर्मचारी व 40 गृहरक्षक दलाचे जवानही एस.आर.पी. चे 100 जवान तैनात करण्यात आले होते. पोलीस निरक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी विशेष मेहनत घेताना दिसून आले त्यामुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेड सौ. भाग्यश्री मोरे तहसीलदार दत्तात्रय बेर्डे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनखाली महसूल विभागाचे व विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी यांनी निवड प्रक्रियेत सहभाग नोंदविला. चुरशीच्या लढतीमुळे पोलिस दलाने घेतली विशेष काळजी- महाविकास आघाडीमुळे सुरुवातीला निरस वाटणारी निवडणुक अपक्षांच्या आव्हानामुळे उत्तरोत्तर रंगतदार झालेली दिसून आलेली आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी वर्षभर आधीपासून निवडणुकांची तयारी केलेली असल्याने प्रचाराची रंगत वाढली असून निवडणुकीत पैशाच्या घोडेबाजाराची चर्चा असल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.
शनिवारी पूर्ण रात्रभर पोलिसांनी न.पं.मधील सर्वच प्रभागात जोरदार गस्त घातल्याचे दिसून आले. याचबरोबर अनेक प्रभागात रात्रभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता
सकाळी 7.30 दुपारी 3.30 या पूर्वार्धातील वेळेत सरासरी 76.08 टक्के इतके मतदान झाले या वेळेत प्रभाग क्रमाक 14 मध्ये सर्वाधिक म्हणजे 92.31 टक्के इतके मतदान झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 16 मध्ये 66.03 टक्के झाले. मतदानाच्या उत्तरार्धात मतदानाचा कल कमी झाला तरी 80.00 टक्क्यांहून अधिक मतदानाची पंरपरा कायम राहण्याचीच शक्यता असून मंडणगडमधील जबाबदारीने मतदान करण्याच्या मानसिकतेबरोबरच बहुरंगी लढतीमुळे उमेदवारांकडून मतदाराना शक्य तेवढ्या लवकर मतदान करण्याचा आग्रह होताना दिसून आलेला आहे.
दोनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा
मंडणगड शहराची मतदार संख्या मुळातच कमी. त्यातही 4 प्रभागांची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असल्याने आज केवळ 2215 मतदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. मतदानासाठी पोलिस खात्यातील विविध पदांवरील अधिकारी एस.आर. पी. चे जवान, व गृहरक्षक दलाचे जवान मिळून 200 हून अधिक कर्मचार्यांचे मनुष्यबळ निवडणूक बंदोबस्तासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहरात तैनात असल्याने मतदाते कमी व पोलिस जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातही मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी निवडणूक विभागाने घेतली.