कोकण

दहावी परीक्षेतही सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

मोहन कारंडे

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी शुक्रवारी दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणसह सिंधुदुर्गातील मुलांनी राज्यात बाजी मारली आहे. सलग बाराव्या वर्षी सिंधुदुर्ग आणि सलग अकराव्या वर्षी कोकण राज्यात अव्वल ठरले आहे. दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल राज्यात सर्वाधिक 99.27 टक्के लागला असून सिंधुदुर्गचा निकाल 99.42 आणि रत्नागिरीचा निकाल 99.20 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील 197 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

जिल्ह्यात कणकवलीतील सेंट उर्सूला स्कूल वरवडेचा आर्यन सुरेंद्र मोरये हा 99.40 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. तर याच हायस्कूलची पूजा रवींद्र अडसूळ, नीरजा प्रदीप मांजरेकर, एस.एम. कणकवलीची स्वरा रमण बाणे, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची अनुष्का मनीष गांधी, कुडाळ हायस्कूलची विद्या दत्तप्रसाद वालावलकर, मालवण टोपीवाला हायस्कूलची तन्वी चौकेकर यांनी 99.20 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आणि पाट हायस्कूलची देविका गिरीधर पडते हिने 99 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.

गतवर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. माध्यमिक शाळा स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तसेच प्रथम सत्र, सराव परीक्षा आणि अन्य मूल्यमापन यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल तयार करण्यात आला होता. गतवर्षी दोन्ही जिल्ह्यांचा निकाल 100 टक्के लागला होता. मात्र, यावर्षी नियमितपणे परीक्षा पार पडल्या आणि शिक्षण मंडळाने निकालही वेळेवर लावला. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले.

दहावी निकालातही मुलींची बाजी

सिंधुदुर्गात दहावी निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. सिंधुदुर्गातून दहावी परीक्षेसाठी 10,121 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 10,111 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातून 10,053 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.34 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणे 99.50 टक्के आहे. कोकण बोर्डातून परीक्षेस बसलेल्या 30,816 विद्यार्थ्यांपैकी 30,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 15,614 मुले आणि 14,979 मुलींचा समावेश आहे.

सावंतवाडी तालुक्याचा सर्वाधिक निकाल

सावंतवाडी तालुक्याचा दहावीचा निकाल सर्वाधिक 99.94 टक्के लागला आहे. त्या खालोखाल दोडामार्ग तालुक्याचा 99.76 टक्के, देवगड तालुक्याचा 98.89 टक्के, कणकवली तालुक्याचा 99.19 टक्के, कुडाळ तालुक्याचा 99.58 टक्के, मालवण तालुक्याचा 99.20 टक्के, वैभववाडी तालुक्याचा 99.42 टक्के आणि वेंगुर्ले तालुक्याचा 99.50 टक्के लागला आहे.

सिंधुदुर्गचा पुनर्परीक्षार्थींचा निकाल 70.98 टक्के

सिंधुदुर्गचा पुनर्परीक्षार्थींचा निकाल 70.98 टक्के लागला आहे. तर कोकण बोर्डाचा पुनर्परीक्षार्थींचा निकाल 82.63 टक्के लागला आहे. पुनर्परीक्षेसाठी सिंधुदुर्गातून परीक्षेस बसलेल्या 193 विद्यार्थ्यापैकी 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीत 5297 विद्यार्थ्यांनी मिळवले डिस्टींक्शन

दहावी परीक्षेत सिंधुदुर्गात 5297 विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन मिळवले आहे. तर 3556 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 1081 विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणी मिळवली असून 119 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डातही 13,770 विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन, 12,121 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 4,229 विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणी मिळवली असून 473 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शुक्रवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेसह अनेक ठिकाणी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावर्षी निकालाचे वैशिष्ट म्हणजे बहुतांशी विद्यार्थी हे डिस्टींक्शन, प्रथम आणि व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.एकूणच मुलांच्या गुणांच्या टक्केवारी बरोबरच गुणवत्तेचीही टक्केवारी वाढली आहे.

संविता आश्रममधील दोन मुलींचे यश

जीवन आनंद संस्था संचलित, संविता आश्रम पणदूरमधील कु. रेणुका हिने 51 टक्के व प्रणाली हिने 53 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. आश्रमात राहून या मुलींनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT