कोकण

तारकर्ली समुद्रात जालन्याच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

अनुराधा कोरवी

मालवण ः मालवण- तारकर्ली येथे समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना सचिन एकनाथ जाधव (22 रा. भिवपुर-भोकरदन, जालना) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास तारकर्ली पर्यटन महामंडळ केंद्रा समोर समुद्रात घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. सचिन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

पर्यटन हंगामाच्या सुरूवातीस घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) येथून सात पर्यटकांचा ग्रुप रविवारी दुपारी तारकर्ली येथे पर्यटन सफरीसाठी आला होता. यात सचिन एकनाथ जाधव (रा. जालना), सचिन शिवाजी देठे, योगेश पुंडलिक दळवी, योगेश आत्माराम खिल्लारे, विनोद काकासाहेब खिल्लारे, विठ्ठल विष्णू दळवी, चालक रमेश एकनाथ काटकर (सर्व रा. औरंगाबाद) यांचा समावेश होता.

यातील सहाजण दुपारी पर्यटन केंद्रासमोरील सुमद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते.पैकी काही वेळाने पाच जण समुद्रातून बाहेर आले तर सचिन जाधव हा एकटाच समुद्रात होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन हा बुडत असल्याचे त्यांच्या साथीदारांना दिसून येताच त्यांनी आरडाओरड केली असता स्थानिक ग्रामस्थ वैभव सावंत, दशरथ चव्हाण यांनी समुद्रात जात बुडणार्‍या सचिन जाधवला किनार्‍यावर आणले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलीस पाटील भानुदास येरागी यांनी मालवण पोलिसांना दिली.

SCROLL FOR NEXT