कणकवली ; अजित सावंत : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या धोरणानुसार देशभरातील समांतर महामार्ग एकमेकांशी महामार्गाने जोडण्याचे धोरण राबविले जात आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्ग आणि पुणे-बंगळूर हे महामार्ग तळेरे ते कोल्हापूर या राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन जोडले जाणार आहेत. सुमारे 83 कि.मी. लांबीचा तळेरे ते कोल्हापूर हा प्रस्तावित महामार्ग दुपदरी होणार आहे. त्याचा सुमारे 300 कोटींचा डीपीआर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अर्थात यासाठी तांत्रिक प्रक्रिया व इतर आवश्यक परवानग्या लक्षात घेता प्रत्यक्षात या महामार्गाचे काम सुरू होण्यास आणखी किमान दोन वर्षांचा कालावधी उलटणार आहे.
या नव्या महामार्गामध्ये गगनबावडा (करूळ) घाटमार्ग 7 मीटरवरून 10 मीटर रुंदीचा होणार आहे. महामार्ग प्रत्यक्षात साकारल्यानंतर सिंधुदुर्ग-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग हा प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील रस्ते वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा अधिकाधिक गतिमान करण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली.
जे पूर्वीचे महामार्ग होते त्यांचे चौपदरी, सहापदरी लेनमध्ये रुपांतर करतानाच प्रमुख राज्यमार्गांनादेखील महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेत त्या निकषांवर या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये तळेरे-कोल्हापूर या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणार्या प्रमुख राज्य मार्गाला दोन वर्षांपूर्वी महामार्गाचा दर्जा देण्यात आला.
त्यामुळे हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वषार्ंपूर्वी महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आला. गेली दोन वर्षे या मार्गाची देखभाल दुरुस्ती महामार्ग प्राधिकरणकडूनच केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या राज्य मार्गाचा महामार्ग कधी होणार याची प्रतीक्षा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हावासीयांना आहे. या नव्या महामार्गाची सिंधुदुर्ग हद्दीतील लांबी 31 कि.मी. असून कोल्हापूर हद्दीतील लांबी 52 कि.मी. आहे.
पावसाळ्यासाठी गगनबावडा घाटमार्ग सज्ज
कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा सर्वाधिक वर्दळीचा घाटमार्ग म्हणून करूळ (गगनबावडा) हा घाटमार्ग ओळखला जातो. नागमोडी वळणांचा आणि धोकादायक दरडी असलेला हा घाटमार्ग महामार्गाच्या नव्या कामात अधिकाधिक सुरक्षित होणार आहे. गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गगनबावडा घाटमार्गातील एक संरक्षक भिंत कोसळून रस्त्याचा अर्धा अधिक भाग ढासळला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक महिनाभर बंद ठेवण्यात आली होती.
त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करून हा घाटमार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, पावसाळ्यात या घाटमार्गात मोठ-मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग नादुरुस्त झाला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांसह त्या भागातील जनतेने या घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनही केले होते. अखेर गेल्या दोन महिन्यात घाटमार्गाची दुरूस्ती करण्यात आली. आता पावसाळ्याअगोदर डांबरीकरण केले जाणार आहे.
पावसाळ्यात ढासळलेली संरक्षक भिंत आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटीचा खर्च करण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा घाटमार्ग वाहतुकीसाठी सज्ज असल्याचे महामार्ग प्राधिकरणचे खारेपाटण उपविभागाचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी सांगितलेे. सद्यस्थितीत या घाटमार्गात धोकादायक दरडी नाहीत, तरीही पावसाळ्यात दरडी कोसळल्यास जेसीबीसह आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घाटमार्गाची जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही पाहणी केली आहे.
महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आणखी दोन वर्षे जाणार
नव्या हायवेच्या कामात करूळ घाटमार्ग 10 मीटर रुंदीचा होणार आहे. यामध्ये धोकादायक दरडी काढून हा घाटमार्ग अधिक सुरक्षित केला जाणार आहे. तर तळेरे ते कोल्हापूर हा संपूर्ण मार्गच महामार्गाच्या निकषावर करताना दुपदरी केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 300 कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. यात कमी जास्त अंदाजपत्रक होवू शकते. तळेरे ते कोल्हापूर या मार्गातील अनेक भागाची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कामांची मुदत संपल्यानंतरच म्हणजे आणखी दोन वर्षानी महामार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकीसरे रेल्वे फाटकावरील अंडरपासचे काम ऑक्टोबरपासून तळेरे-कोल्हापूर या महामार्गाच्या दरम्यान वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथे रेल्वे फाटक आहे. फाटकामुळे या मार्गावरील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह जनतेने सातत्याने या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी केली होती. मात्र गतवर्षी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी अंडरपास करण्याचा निर्णय घेतला.
भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने यासाठी केंद्र सरकार आणि कोकण रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. या अंडरपासच्या कामासाठी सुमारे 28 कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोकण रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला आहे. रेल्वे प्रशासन हे काम पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे. वरून रेल्वे आणि खालून रस्ता असा हा अंडरपास होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता श्री. शिवनिवार यांनी सांगितले.