चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : ज्या लोकांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हायला लावले ते शिवसैनिक कसे होतील? असा सवाल माजी केंद्रीयमंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी चिपळुणातील मेळाव्यात उपस्थित केला. त्यांच्या या सवालाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळावा. त्यामुळे आता संभ्रम नको निर्धार करा, असे आवाहन यावेळी माजी खा. गीते यांनी केले.
शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदारसंघ व चिपळूण तालुक्याचा शिवसेना मेळावा कापसाळ येथील माटे सभागृहात आज (दि.11) सकाळी झाला. यावेळी माजी खा. अनंत गीते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना उपनेते आ. राजन साळवी, प्रवक्ते व आ. भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जि. प. अध्यक्ष उदय बने, रोहन बने, विक्रांत जाधव, महिला जिल्हाप्रमुख अरुणा आंब्रे, गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, बाळा कदम, उमेश सकपाळ, उमेश खताते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत गीते म्हणाले, हे बंड भाजपप्रणित आहे. फक्त सत्तेसाठी सेनेच्या गळ्याला नख लावण्याचा पंतप्रधान मोदींनी प्रयत्न करू नये, असा इशारा आपण देत आहोत आणि तो इशारा देण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करू नये. त्यांना आपण मातीत गाडून टाकू. त्यांच्या गळ्यात पट्टा आहे आणि साखळी भाजपच्या हातात आहे. जनतेच्या न्यायालयात गेल्यावर जनताच त्यांना टकमक टोक दाखवेल.
शिवसेनेत बंडाळी का झाली, कशामुळे झाली, त्याला काय कारणे आहेत हे विचारण्याची आज वेळ नाही. जे झाले ते झाले. मात्र, यापुढे अशाप्रकारचा प्रसंग ओढवणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. अर्थात बंडाळीच्या कोरोनाचा फैलाव होऊ नये, त्याची लस देण्यासाठीच हा निर्धार मेळावा आहे. जे गेले त्यांना जाऊदे. आता तो विचार करायचा नाही. त्यांना या शिवसैनिकांची हाय बाधेल. रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे ताकदीनिशी शिवसेनेच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे रत्नागिरी व दापोलीत काळजी करण्याची गरज नाही. दापोली येथेही आपण लवकरच मेळावा घेणार आहोत. त्यावेळी ताकद दाखूवन देऊ. शिवसैनिक बरोबर असताना घाबरायचे कारण नाही असे गीते यांनी सांगितले. आगामी काळात आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेने यापुढील सर्वप्रकारच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात यासाठी मागणी करणार आहोत असे सांगितले.
उपनेते आ. राजन साळवी म्हणाले, आपण अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत आहोत. जिल्हाप्रमुखपद भूषविले आहे. शिवसेनेमुळेच आपल्याला आमदारकी मिळाली. मात्र, जर अन्याय झाल्याचे ते सांगत असतील तर आपल्यावर अन्याय झाला हे लक्षात घ्यायला हवे. पक्षाने ज्यांना सर्वकाही दिले तेच आज अन्याय म्हणून बोलत आहेत. शिवसेनेसाठी पराभव होणार माहीत असताना आपण सेनेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलो असे सांगून आपली राजकीय कादकीर्द सांगितली.
या निर्धार मेळाव्यात शिवसेना प्रवक्ते आ. भास्कर जाधव म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत घाव घालून बंड करण्यात आले आहे. हा घाव म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हे प्रकरण एवढे छोटे नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला त्यावेळी भाजपवाले पेढा खात बसले होते. त्यामुळे हे सर्व कटकारस्थान भाजपचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप आ. भास्कर जाधव यांनी या मेळाव्यात केला. हे प्रकरण फक्त फुटीपुरते मर्यादीत नाही. अनेक लोकांना अर्थात मराठी माणसांना ईडी, सीआयडी, आयटी मागे लावून केंद्रीय यंत्रणा वापरून केलेले षड्यंत्र असल्याचे असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले. या मेळाव्यात प्रास्ताविक तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.