कोकण

चिपळूण : आजपासून परशुराम घाट २४ तास खुला

मोनिका क्षीरसागर

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये हा घाट 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर घाट बंदची मुदतवाढ जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी नाकारल्यानंतर आता उद्या दि. २६ पासून परशुराम घाटातून चोवीस तास वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे कोकणसह जिल्हाभरातील एस.टी. वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून सुरळीत होणार आहे.

परशुराम घाटातील धोकादायक भागातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून ठेकेदार कंपन्यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्‍यांनी परशुराम घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल ७००मीटर लांबीच्या एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यश आले असून आगामी १५ जूनपर्यंत आणखी ३०० मीटरचे काँक्रिटीकरण पूर्ण
करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.

घाट बंदच्या काळात पावसाने उसंत घेतल्याने या कामाला गती मिळाली. ईगल इन्फ्रा आणि कल्याण टोलच्या माध्यमातून हे काम करण्याात आले. मात्र, या कामापैकी कल्याण टोल कंपनीचे काम धीम्या गतीने झाल्याचे पुढे आले आहे. त्या तुलनेत ईगल कंपनीने मोठी यंत्रणा वापरून बहुतांश काम करण्यात यश मिळविले आहे. ईगल कंपनीकडे चौदाशे मीटरचे काम आहे. त्यापैकी सातशे मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले असून येत्या काही दिवसांत आणखी तीनशे मीटरचे काँक्रीटीकरण करण्यात येईल.उर्वरित चारशे मीटरचे काम मात्र पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे.

या कालावधीत ४० डम्पर, १२ पोकलेन आदी यंत्रणा वापरून ईगल कंपनीने धोकादायक डोंगर आणि खडकाचा भाग खाली उतरविण्यात यश मिळविले आहे. आता उतरलेली दगड, माती घाटातून हलवली जाणार आहे. त्या तुलनेत कल्याण टोलचे काम धीम्या गतीने झाले. या कंपनीचे काम धोकादायक भागात आहे. मात्र, हे काम गतीने न झाल्यामुळे पावसाळ्यातील परशुराम घाटातील वाहतुकीला धोका संभवत आहे. त्यामुळे आगामी काळात वाहनचालकांनी परशुराम घाटातून वाहतूक करताना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT