चतुर्थीच्या रात्रीत कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ 
कोकण

चतुर्थीच्या रात्रीत कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ

रणजित गायकवाड

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवामुळे चेकनाक्यांसह ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, परिणामी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून न होणारी रात्रीची गस्त, गणेशचतुर्थीमुळे व्यापार्‍यांनी लवकर बंद केलेली दुकाने या संधीचा पुरेपूर वापर करत चोरट्यांनी गणेशचतुर्थी दिवशी शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे 2.30 वा.च्या सुमारास कणकवलीत महामार्गालगतच्या खासगी कार्यालयांसह 6 दुकाने फोडली. तीन ठिकाणी त्यांचा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला. तेथे रोख रकमेसह किमती वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला, तर बाजारपेठेत एका मोटारसायकलच्या टाकीसह अनेक पार्टची चोरी केली. एकूण या चोर्‍यांमध्ये रोख रकमेसह सुमारे 50 हजार 500 रु.चा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

एकाच रात्रीत चोरट्यांनी घातलेल्या हैदोसामुळे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे आणि नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. चोरट्यांनी दुकाने आणि कार्यालयांचे शटर कोणत्या तरी हत्याराने उचकटले आणि चोर्‍या केल्या. काही ठिकाणी त्यांना शटर उचकटता न आल्याने हाती काही लागले नाही. कणकवली गांगोमंदिर समोरील चिंतामणी पार्कमधील प्रसाद एकनाथ सावंत (रा.वरवडे) यांचे फार्मा प्लस सर्जिकल नावाचे दुकान आहे, त्याचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील 16 हजारांची रोकड आणि 16 हजार किमतीचे 8 पल्स ऑक्सिमीटर चोरून नेले व इतर सामान अस्ताव्यस्त केले. त्याच कॉम्प्लेक्समधील संजय अर्जुन गुरव (रा.कलमठ) यांचे फॅमिली फॅशन गारमेंटचे शटर उचकटून गल्ल्यातील 12 हजाराची रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी एस. एम. हायस्कूलसमोरील भालचंद्र बाबा मॉलमधील डॉ. किशोरी मोहन कदम यांचे प्रकृती आयुर्वेदीक चिकित्सालयाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

त्याच बिल्डींगमधील गितेश महेंद्रकुमार मुरकर यांचे जीएम अ‍ॅण्ड असोसिएट आर्किटेक्ट नावाचे खाजगी कार्यालय असून त्या कार्यालयाचा शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र तोही अयशस्वी ठरला. त्याच इमारतीतील कुलदीप पूनमसिंग रजपूत यांचे माऊली इलेक्ट्रीकल दुकान असून त्या दुकानाचाही शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. नंतर चोरट्यांनी मोर्चा कणकवली पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समध्ये वळविला. तेथील प्रकाश निमणकर यांचा लक्ष्मी डिजिटल फोटो स्टुडिओचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील 1500 रू. रोख रक्कम लंपास केली. त्याचबरोबर कणकवली बाजारपेठेतील झेंडाचौक येथे असलेल्या अमित सापळे यांची मोटरसायकलची टाकी, बॅटरी व मडगाळ असे सुमारे 5 हजार रू.किंमतीचे पार्ट चोरून नेले.

साधारणपणे हा प्रकार शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे 2.30 या दरम्यान घडला. रात्री सव्वाअकराच्या सुमारास चिंतामणी कॉम्प्लेक्समधील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमचे वॉचमन दाऊद अलीखान यांनी प्रसाद सावंत यांचे नातेवाईक सूरज नाईक यांना मोबाईलवरून प्रसाद सावंत यांच्या दुकानाचा शटर उघडा असल्याचे सांगितले. श्री. सावंत यांनी त्या ठिकाणी जावून पाहीले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कणकवली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका पाठोपाठ एक सहा ठिकाणी चोरट्यांनी चोर्‍या आणि चोर्‍यांचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण केले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकही तपासासाठी आले होते. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात त्यांना अपयश आले. चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या, मात्र त्या अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.

चोरटे भुरटे आणि परप्रांतीय

ज्या अर्थी चोरट्यांनी महामार्गालगतचीच दुकाने आणि कार्यालये फोडली त्या अर्थी हे चोरटे परप्रांतीय असल्याचे स्पष्ट होत आहे. जाता जाता त्यांनी या चोर्‍या केल्या. तसेच त्यांची मोडस ही भुरट्या चोरट्यांप्रमाणेच आहे. जेथे जेथे शटर उचकटले तेथे त्यांनी चोर्‍या केल्या तर काही ठिकाणी शटर त्यांना उचकटून खोलता आले नाहीत. मात्र रात्री दहा-साडेदहा वाजता चोरट्यांनी भरवस्तीत केलेले धाडस निश्चितच पोलिस यंत्रणेची चिंता वाढविणारे आहे.

अपुर्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा फटका

कणकवली पोलिस स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती पोलिस स्थानक आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू कणकवलीच असतो. त्यामुळे या संवेदनशील तालुक्याच्या पोलिस स्थानकामध्ये पुरेसा पोलिस कर्मचारी आणि अधिकारी वर्ग देणे आवश्यक आहे. कणकवली पोलिस स्थानकासाठी 83 पोलिस कर्मचारी मंजूर आहेत. परंतु त्यातील बहुतांशी पदे रिक्त आहेत. राजकीय कार्यक्रम तसेच इतर कारणांसाठी लागणारा बंदोबस्त पाहता असलेले कर्मचारी अपूर्ण पडतात त्यामुळे गस्तीवर मोठा परिणाम होतो. त्याचाच फायदा चोरटे घेतात. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन याबाबत गांभिर्याने दखल घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT