रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या प्रारंभीच बदललेल्या वातावरणाने आणि काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाने कोकणात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रांवरील फळबागांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कोकणातील ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांना बसला आहे.
कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, नुकत्याच झालेल्या अवकाळीत, वादळी वारा यामुळे कोकणातील बागायतीवर परिणाम झाला आहे. याबाबतची कैफियत येथील शेतकर्यांनी मांडली होती. याबाबत शासनाकडेही भरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कोकणातील पाचही जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर करण्यात आलेल्या पाहणीत कोकणात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेेत्रावर फळबागायतीची हानी झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. अचानक वाढलेल्या तापमानाने येथील काजू आणि आंब्याचे उत्पादन अडचणीत आले आहे. मात्र याबाबत अद्याप केवळ प्राथमिक स्तरावर पंचनाम्याची कार्यवाही सुरू असल्याने भरपाईबाबत संदिग्धता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा नुकसान (हे.)
ठाणे 1,230
पालघर 2,017
रायगड 147
रत्नागिरी 225
सिंधुदुर्ग 43
एकूण 3,662