कोकण

कोकण : कुंपणावरील सदस्यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

दिनेश चोरगे

रत्नागिरी,  दीपक कुवळेकर :  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात जाहीर होतील. यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर राज्यात सुरू असणार्‍या 'सत्तानाट्या'मुळे इच्छुकांचा पक्षप्रवेश थांबला आहे. राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आले तर आपली गोची होईल, अशी अनेकांना भीती वाटत आहे. तसेच राज्यात सत्तेचे गणित फिसकटलं तर याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो. यामुळे अनेक कुंपणावरील सदस्यांनी 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

राज्यात सध्या 'राजकीय भूकंप' जोरात सुरू आहे. दिवसेंदिवस या बंडाच्या नाट्याला वेगवेगळी कलाटणी मिळत आहे. जिल्ह्याच्या राजकारणालाही याची झळ पोचली आहे. प्रथम खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम व नंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करत शिंदे गटात सामील झाले. यामुळे सेनेमध्ये सध्या कमालीची शांतता पसरली आहे. जिल्ह्यात सेनेच्या चार आमदारांपैकी दोन आमदारांनी सुरुवातीला आपण कट्टर शिवसैनिक असून शिंदे गटात सामील होणार नाही असे सांगत होते. मात्र, असे सांगता सांगताच त्यांनी 'गुवाहाटी' कधी गाठली ते कार्यकर्त्यांनाही समजले नाही. अजूनतरी भास्कर जाधव व राजन साळवी हे दोन आमदार सेनेतच आहेत.  यामुळे शिवसैनिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राज्यात टप्प्या टप्प्याने होणार आहे. तसे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. कोकणात साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीनाट्य घडत असल्याने जे इच्छुक जि.प. व पं.स. सदस्य तसेच कार्यकर्ते होते यांचा पक्षप्रवेश सध्या थांबला आहे. सेनेतील काहीजण हे भाजप किंवा राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. यामुळे आता त्यांची गोची झाली आहे.

काही वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेचा भगवा हातात घेतला होता. याबरोबर त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सेनेत दाखल झाले होेते. त्यापैकी बाबू म्हाप, पर्शुराम कदम, जि.प. सदस्य व गजानन पाटील हे पंचायत समिती सदस्य 'धनुष्यबाण' चिन्ह घेवून निवडून आले होते. आता मात्र सामंत शिंदे गटात गेल्याने त्यांची भूमिका काय असेल? याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर सामंत हे अचानक तिकडे का गेले? कोणत्या कारणासाठी गेले? याबाबतही संभ्रमावस्था आहे. सोशल मीडियावर तर सामंत यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठवल्याची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनाही अजूनही याबाबत काहीच माहीत नाही. एकंदरीत याबाबत गोंधळाचे वातावरण आहे.

दापोली-खेडचे आ.योगेश कदम यांच्याबाबतसुद्धा हीच स्थिती आहे. काही सेनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला तर काहींनी दापोलीत निषेधही केला. त्यांच्याबरोबरसुद्धा कोण-कोण कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

सोशल मीडियावर जिल्हाप्रमुखांची चर्चा…

सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याबाबत सोशल मीडियावर सध्या उलटसुलट चर्चा रंगली आहे. रविवारी देवरूख येथील सेनेच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची अनुपस्थिती होती. आणि त्याचवेळी उदय सामंत हे गुवाहाटीला गेल्याची बातमी समोर आली. विलास चाळके यांना जिल्हाप्रमुख बनवण्यासाठी उदय सामंत यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे ही उलटसुलट चर्चा रंगली होती. असे असले तरी विलास चाळके हे आजारी असल्यामुळे या मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही, असे स्वत: चाळके यांनी स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT