कुडाळ : विनापरवाना उत्खनन केलेल्या वाळुची चोरी करून वाहतूक केल्याप्रकरणी दोन डंपरचालक व दोन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई महसूल व कुडाळ पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री १०.११ वा. कुडाळ एमआयडीसी येथील बजाज राईस मिलसमोर केली. या चौघांनाही कुडाळ न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
कुडाळ तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक होत असल्याने त्याला लगाम लावण्यासाठी महसूल प्रशासनाने महसूल व पोलिस असे संयुक्त कारवाईचे पथक शुक्रवारी स्थापन केले आहे. या पथकाने केलेली ही पहिली कारवाई आहे. या पथकाने बजाज रा ईस मिल समोर दोन डंपरची तपासणी केली असता चालकांकडे वाळू वाहतुकीचा पास आढळला नाही. त्यामुळे पथकाने डंपर वाळुसह ताब्यात घेतले. यानंतर या दोन्ही डंपरच्या मालकांनाही ताब्यात घेतले. यामध्ये
डंपर चालक ऋतीक प्रदीप महाले (२४, रा. डिचोली उत्तर गोवा) व सागर गजानन मुंडये (३३, रा. सराफदारवाडी पिंगुळी) तसेच डंपर मालक जॉनी न्यूटन लोगो (२१, रा. साटेली भेडशी, ता. दोडामार्ग) व हेरंभ राजन कुंभार (२३, रा. एमआयडीसी कुंभारवाडी) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे ३०३ (२), ३ (५) व मोटरवाहन कायदा कलम ३ (१) तसेच खाण आणि खनिज (विनीयमन) कलम २१ व पर्यावरण (संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वाळू व दोन डंपरसह ९ लाख ३० हजारचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वरील चौघांना अटक करत कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची फिर्याद स्वप्निल रामचंद्र तांबे यांनी कुडाळ पोलिसात दिली.