सावंतवाडी : नागेश पाटील
नियोजित बेळगाव, चंदगड, सावंतवाडी या गेली दशको रखडलेल्या रेल्वेमार्ग प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विचार सुरू केला आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याशी बेळगांवचे खा. जगदीश शेट्टर यांची चर्चा झाली असून दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात हा रेल्वे मार्ग झाल्यास सावंतवाडी व्यापारी व पर्यटनदृष्ट्या नावारूपास येईल.
बंदरे रेल्वेने जोडली जावीत या उद्देशाने हे सर्वेक्षण झाले होते. पुढे काही कारणाने हा प्रकल्प रखडला तो अद्यापही जैसेथेच आहे. हा जुना रेल्वे मार्ग झाल्यास सावंतवाडीला गतवैभव नक्कीच प्राप्त होईल. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग हे दोन्हीही शहराच्या बाहेरून गेल्याने शहराचे अर्थकारण खुंटले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास शहराच्या खुंटलेल्या विकासाला नवसंजीवनी प्राप्त होईल
बेळगाव, चंदगड, सावंतवाडी मार्गाचे पहिले सर्वेक्षण १९७० साली झाले. त्यावेळी कोकण रेल्वे मार्ग अस्तित्वात नव्हता, त्यामुळे फक्त २०१८ साली बेळगांवचे खासदार कै. सुरेश आंगडी हे रेल्वे राज्यमंत्री झाले आणि या प्रकल्पाला पुन्हा चालना मिळाली. त्यात चंदगडचे लोकप्रतिनिधी या रेल्वे मार्गासाठी कमालीचे आग्रही असल्याने लगेच या रेल्वे मार्गाचे दुसरे सर्वेक्षण देखील पार पडले. त्याचा 'फिझिबिलिटी रिपोर्ट' रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. ११४.६. किलोमीटर लांबीच्या हा रेल्वे मार्ग असून अनेक छोटे मोठे पूल असणारा हा मार्ग सावंतवाडीतून आंबोली, चंदगड नंतर थेट बेळगांवला जोडला जाईल. तर पुढे कोकण रेल्वे थेट दक्षिण पश्चिम (नैऋत्य) रेल्वेला जोडली जाईल. पण कोरोना काळात खासदार सुरेश आंगडी यांचे निधन झाल्याने या मार्गाचे काम पुन्हा रखडले. त्यामुळे जुन्या रेल्वे मार्गाचे भविष्य पुन्हा अंधारात दिसू लागले.
त्यांनतर गेल्या काही वर्षापासून चंदगडवासीयांनी या मार्गासाठी पुन्हा पुढाकार घेतला असून या मागणीसाठी त्यांनी कोल्हापूरचे खासदार श्री छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. याला त्यांनीही सकारात्मकता दाखवून त्या संदर्भात सकारात्मक पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांच्याशीही चर्चा करत संसदेत आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊ असेही छत्रपती शाहू महाराज यांनी सांगत या रेल्वे मार्गाला पाठिंबा दिला होता.
बेळगावचे खा. जगदीश शेट्टर यांनी देखील दक्षिण पश्चिम (नैऋत्य) रेल्वेचे महाव्यवस्थापकांची भेट घेत सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्ग व्हावा ही आग्रही मागणी केली. सावंतवाडी - बेळगाव रेल्वे मार्ग झाल्यास सावंतवाडीच्या विकासात नक्कीच भर पडेल. बेळगाववरून येणारा भाजीपाला, चंदगड येथील काजू, ऊस तर कोकणातून जाणारे मासे यांची सुलभ आवक-जावक होईल, कोकणातील पर्यटन बहरेल, सावंतवाडीतून थेट बेळगाव आणि बेंगलोर या दोन महत्त्वाच्या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे हा नवीन रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.
जुन्या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनीही रुची दाखवली आहे. बेळगाव - धारवाड हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे; तो बेंगलोरला जोडला जाईल. त्यालाच पूरक असा बेळगाव, चंदगड, कोल्हापूर, सावंतवाडी हा गेली दशको एक तप रखडलेला जुना रेल्वे प्रकल्प देखील हाती घेतला जावा त्यानुसार केंद्र शासनाच्या भारतमाला योजनेंतर्गत बेळगाव- धारवाड नूतन प्रकल्पाबरोबरच याही प्रकल्पाचा प्राधान्याने विचार करण्यास सुरुवात झाली आहे. हे दोन्ही प्रकल्प झाल्यास यांचा सावंतवाडी किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याला व्यापारीदृष्टया फायदा होणार आहे.