Suspicious Death Malvan
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रेवंडी-तांडेलवाडी येथे एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीधर नरे असे मृत तरुणाचे नाव असून तो देवगड तालुक्यातील मिठबांव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला संशयास्पदरीत्या घटनास्थळावरून निघून जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सतर्क ग्रामस्थांनी तातडीने तिचा पाठलाग करून तिला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित महिला मृत तरुणाच्या गावातील असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक दुचाकी, दारूच्या बाटल्या तसेच काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती आहे. या वस्तू आणि परिस्थितीमुळे घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून, तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संबंधित महिलेचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, तसेच तरुणाच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी यांमधून या घटनेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांच्या तपासातून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.