drowning Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Drowning Death : आंबेरी येथील देवकोंड नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

मित्रांच्या डोळ्यादेखत घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : माणगाव-आंबेरी येथील पुलानजीक असलेल्या देवकोंड परिसरात नदीपात्रात बुडून प्रतिराज भार्गव कुडपकर (३३, रा. वेंगुर्ला कॅम्प, भटवाडी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली.

वेंगुर्ला तालुक्यातील तीन मित्र देवकोंड येथे आले होते. त्यापैकी एका तरुणाचे नातेवाईक या परिसरात राहत असल्याने ते नातेवाईकांकडे आले होते. शनिवारी दुपारी तिघेही मित्र आंघोळ करण्यासाठी माणगाव-आंबेरी पुलानजीकच्या देवकोंड नदीपात्रात गेले होते. प्रतिराज कुडपकर हा नदीपात्रात आंघोळ करत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला. या अनपेक्षित घटनेने सोबत असलेले मित्रही घाबरून गेले. त्यांनी तातडीने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाचे चुलतभाऊ संतोष सुदर्शन कुडपकर यांनी याबाबत खबर दिली. घटनेचे वृत्त समजताच कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे तसेच माणगाव दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी आणि कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही सुरू केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. वेंगुर्ला येथील तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुडपकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT