देवगड : कुणकेश्वर येथील एका हॉटेलच्या खालच्या बाजूला समुद्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ५ ऑगस्ट रात्री ११.१० वा. च्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव चेतन मोहन परब (३५, रा. खालचीवाडी, कुणकेश्वर) असे आहे. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
चेतन परब आपल्या मित्रासमवेत समुद्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. खेकडे पकडत असताना त्यांचा अचानक पाय घसरून तोल गेला आणि तो समुद्रात पडला. काही वेळाने पाण्याच्या प्रवाहासोबत तो किनाऱ्यावर आला. मात्र, त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच त्यांचे मामा दिनेश महादेव धुवाळी तसेच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवगड येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दिनेश महादेव धुवाळी (४५, रा. खालचीवाडी, कुणकेश्वर) यांनी दिलेल्या खबरीवरून देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एम. व्ही. महाडिक करीत आहेत.
चेतन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा,भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. चेतन हा इलेक्ट्रिक फिटिंग व प्लंबिंगचे काम करत होता. कुणकेश्वर बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.