दोडामार्ग : माटणे वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक बेशुद्धावस्थेत असून तिघांनाही पुढील उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी सायंकाळी ४.४५ वा.च्या सुमारास हा अपघात झाला. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की या अपघातात दीपक हरमलकर (४५, रा. मये, डिचोली-गोवा) यांचा जागीच मृत्यू झाला. रामा सुरेश गवस (२५, रा. वझरे) हा बेशुद्धावस्थेत असून गणू उसपकर (३३, रा. मये) आणि जयराम शिरोडकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
दीपक हरमलकर व गणू उसपकर हे ॲक्टिव्हा दुचाकी घेऊन दोडामार्ग ते आयी जात होते. त्याचवेळी रामा गवस व जयराम शिरोडकर हे एफझेड दुचाकी घेऊन आयी ते दोडामार्ग येत होेते. माटणे वजन काट्याजवळ दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात ॲक्टिव्हा रस्त्यापासून दूर फेकली गेली, तर एफझेड ५० ते ६० मीटरपर्यंत फरफटत गेली. दोन्ही दुचाकींवरील चौघेही हवेत उडून रस्त्यावर आदळले. या अपघातात दीपक हरमलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतर तिघेही गंभीर अवस्थेत वेदनेने विव्हळत पडले होते.
१०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक हरमलकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रामा गवस हा बेशुद्ध झाला असून गणू उसपकर यांच्या हात-पायांना फ्रॅक्चर झाले आहे. जयराम शिरोडकर यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तिन्ही जखमींना अधिक उपचारासाठी गोवा जीएमसी (बांबोळी) येथे हलविण्यात आले.