वैभववाडी ः कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला आहे. याबाबत आपण रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. लवकरच या रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती खा. नारायण राणे यांनी दिली. वैभववाडी तालुक्यात नाधवडे येथे एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप महायुतीचे कणकवली मतदारसंघाचे उमदेवार नितेश राणे यांच्या वैभववाडी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उमेदवार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, संतोष शास्त्री महाराज, कोकरे महाराज, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, भाजप मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, राष्ट्रवादी(अ.प.) काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, आरपीआय तालुकाध्यक्ष रवींद्र जंगम व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. राणे म्हणाले, राज्य शासनाची ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय झाली आहे. सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू, अशा धमक्या विरोधक देत आहेत, परंतु त्यांची सत्ता येणारच नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही. नरेंद्र मोदी हे 2014 ला पंतप्रधान झाले. त्यांनी खर्या अर्थाने देशातील गरिबी नाहीशी केली. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले. बारा कोटी लोकांना हक्काची घरे दिली. जलजीवन सारखी योजना राबवून 12 कोटी लोकांना घर तिथे पाणी दिले. अशा अनेक योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात सुरू आहेत. विश्वकर्मासारख्या योजनेचे फायदे बारा बलुतेदारांना होत आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्प राज्यात सुरू केले. विमानतळे वाढवली. 2014 ला जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 11 व्या स्थानी होता. 2024 ला तो पाचव्या स्थानी आहे. काही वर्षातच भारत 3 नंबरला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Maharashtra assembly poll)
वैभववाडीच्या नावातच वैभव आहे. विनोद तावडे यांचे हे मामाचे गाव आहे. त्यामुळे मामाच्या गावात येऊन सर्वांशी विनोद तावडे यांनी संवाद साधल्याबद्दल त्यांनी तावडे यांचे आभार मानले. विनोद तावडे, नितेश राणे, प्रमोद जठार, कोकरे महाराज, संतोष शास्त्री महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. वैभववाडी भाजपच्या वतीने नारायण राणे, विनोद तावडे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीका केली. चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री होऊनदेखील पवार ‘लाडकी बहीण’ सारखी योजना कधी राबवू शकले नाहीत. तर ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, परंतु केवळ दोनच दिवस ते मंत्रालयात गेले. जागतिक राजकारणातील हे कदाचित एकमेव उदाहरण असावे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.(Maharashtra assembly poll)