मळगाव : पावसाळ्यात डोंगर कपारीत नैसर्गिकरीत्या उगवणारी दुर्मीळ ग्राहकांच्या पसंतीचे अळंबी रानभाजी सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. शेकडा 1000 ते 800 रुपये अश्या विक्रमी दराने या अळंबीची विक्री झाली.
पावसाळ्यात कोकणात जंगलातील डोंगर कपारीत केवळ पावसाळी मोसमातच बुरशीजन्य नैसर्गिकरित्या उगवणार्या अळंबी रानभाजीला फार मोठी मागणी असते. अलीकडच्या काळात नैसर्गिकरित्या उगवणारे अळंबी रानभाजी दुर्मीळ होत चालली आहे. पावसाळ्यात विविध प्रकारच्या मोसमी रानभाज्या कोकणात सहज उपलब्ध होतात. येथील जाणकार शेतकरी आपल्या आहारात अशा विविध रानभाज्या वापरतात आणि विक्रीसाठीही आणतात.
अशाच मोसमी रानभाज्यांपैकी नैसर्गिकरित्या उगवणारी अळंबी रानभाजीच्या प्रतीक्षेत येथील ग्राहक असतात. साधारणपणे जुलै व ऑगस्ट महिन्यात अळंबी रानभाजी मिळते.अतिशय औषधी म्हणून समजल्या जाणार्या अळंबी भाजीला फार मागणी आहे. जंगलातून अळंबी भाजी काढताना जाणकार निरखून घेऊन काढतात.
नैसर्गिकरित्या उगवणारे अळंबी रानभाजी दोन प्रकारची असते. विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार अळंबीमध्ये आहेत. त्यामुळे येथील स्थानिक शेतकरी बिनविषारी अळंबी रानभाजी पारख करूनच काढून घेतात आणि ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.पौष्टिक व चवीला स्वादिष्ट असणारी अळंबी रानभाजी सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी आली आहे. या औषधी गुणधर्माने युक्त असणार्या अळंबी भाजीला बाजारात मागणी वाढली आहे. सावंतवाडी बाजारात विक्रीसाठी आलेल्या अळंबीचा दर शेकडा 1000 ते 800 रुपयाचा आहे. या दरात ग्राहक अळंबीची खरेदी करताना दिसत आहेत.विविध रेसिपीमध्ये आस्वाद घेण्यासाठी अळंबीची भाजी खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत.